Maharashtra SSC HSC Supplementary Exams 2020: महाराष्ट्रात 10वी, 12 वीच्या फेर परीक्षा कोरोनाची परिस्थिती पाहून ठरवल्या जाणार; शिक्षण मंडळाची माहिती
HSC, SSC Students | Representational Image | (Photo Credits: PTI)

Maharashtra Supplementary Exam 2020: कोरोना व्हायरस आरोग्य संकटाचा मोठा फटका यंदा शिक्षण क्षेत्राला बसला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून महाराष्ट्रात अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला नाही. पण त्यामुळे यंदा राज्यात 10वी, 12 वीच्या फेर परीक्षा देखील अधांतरी आहे. त्याचं ठोस वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र मीडीया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रात यंदा 10 वी आणि 12वीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या सुमारास होऊ शकतात. मागील महिन्यात या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता मात्र आता त्या अजून पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

दरम्यान लोकसत्ता च्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संसर्गाची परिस्थिती पाहून फेरपरीक्षा घेण्यात येईल. असे सांगितले आहे. कोरोनाच्या सावटाखाली परीक्षा घेण्यात अनेक अडचणी सध्या शिक्षण मंडळासमोर आहेत. प्रशासनाने अनेक शाळा विलगीकरण कक्षासाठी घेतल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग राखत परीक्षा घेण्यासाठी परीक्षा कक्ष वाढवावे लागतील, त्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात वाढवावे लागेल. मात्र, त्यासाठी शाळा पुन्हा उपलब्ध करून घ्याव्या लागणार आहेत, परिणामी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यात येईल असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे. Varsha Gaikwad On School Reopening In Maharashtra: महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरीस शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे. त्यावेळी 10वीचा भूगोला पेपर रद्द करून त्याचे सरासरी मार्क्स देऊन यंदा एसएससीचा निकाल लावण्यात आला आहे. तर 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. परंतू आता फेर परीक्षा लांबल्यास 11 वी प्रवेश प्रक्रियेपासून विद्यार्थी दूर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा शिक्षणातून मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया रोखण्यात आली आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यंदा जेईई, नीट यासारख्या परीक्षा तसेच सीईटी परीक्षा, अंतिम वर्षाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याला मनाई करत कोरोनाच्या सावटाखालीच पुरेशी खबरदारी घेत घेण्याचा मार्ग सुचवला आहे.