ABP माझा ला याविषयी अधिक माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की,"दहावीमध्ये जवळपास 1 लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये 1 लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. मात्र नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत"
महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
महाराष्ट्रामध्ये 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान राज्यात दहावीची परीक्षा पार पडली आहे. यामध्ये कोरोना जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर भूगोल विषयाचा पेपर रद्द करून त्याचे सरासरी गुण देऊन यंदा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबर महिन्यात वर्ग सुरू करण्याचा शिक्षण मंडळाचा मानस आहे.