Maharashtra Board 10th Result 2020: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागणे अपेक्षित आहे, यानुसार सुरु झालेल्या याच आठवड्यात कधीही निकाल जाहीर होऊ शकतो. दरवर्षी साधारणपणे बारावीचा (HSC Results) निकाल जाहीर झाल्यावर एखाद्याच आठवड्याच्या अंतराने दहावीचा निकाल सुद्धा जाहीर केला जातो मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे पेपर तपासणीपासून सर्वच गोष्टींना उशीर झाल्याने निकालाची तारीख पार जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत आली आहे. कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर होऊ शकणार असल्याने आयत्या वेळी तुमची धांदळ उडू नये यासाठी अगोदरच तयारीत राहा, दहावीचा निकाल पाहण्याआधी आपले हॉल तिकीट (10th Hallticket) शोधून ठेवा, ज्या दिवशी निकाल असेल तेव्हा mahresult.nic.in सहित maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्वर तुम्हाला तुमचे गुण तपासता येतील.
दुसरीकडे महाराष्ट्रात कालपासून इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश (FYJC Online Admission) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. यासाठी वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक असेल. निकाल लागल्यावर दुसऱ्या टप्प्यात आपल्या पसंतीच्या कॉलेज चा क्रम निवडायचा आहे. हा दुसरा टप्पा 1 ऑगस्ट पासून सुरु होईल तत्पूर्वी याच आठवड्यात निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. तर यंदा दहावीची परीक्षा 4979 परीक्षा केंद्रांवर पार पडली आहे.