FYJC Online Admission 2020: महाराष्ट्रात 11वी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आज 26 जुलै पासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. Maharashtra FYJC Online Admission 2020 चं सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबादमध्ये आज पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रकिया सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना 26 आणि 27 जुलै या दोन दिवशी फॉर्मचा भाग 1 भरायचा आहे. यामध्ये कागदपत्र आणि वैयक्तिक माहिती यांचा समावेश असेल. कोरोनाचे संकट आणि लॉक डाऊन मुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कमीत कमी वेळात पूर्ण व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे. इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा 1 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या पार्ट 2 मध्ये कॉलेजचा प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना निवडायचा आहे. अद्याप राज्यात शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केलेला नाही. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळे येत्या आठवड्यात निकालाची प्रतीक्षा संपू शकेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. तर यंदा दहावीची परीक्षा 4979 परीक्षा केंद्रांवर पार पडली आहे. यंदा कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द करून त्याचे सरासरी गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.