Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board Exam 2023) दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोविड 19 संकटानंतर यंदा पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षा होणार आहे. पण मागील 2-3 वर्ष विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास झाल्याने लिखाणचा सराव मागे पडला आहे. त्यामुळे आता बोर्डाने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता लेखी परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अधिकचा वेळ दिला आहे. त्यामुळे आता प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटं अधिक वेळ मिळणार आहे.

नुकतीच पालक संघटनेनेदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ मिळावा यासाठी मागणी केली होती. त्यानुसार राज ठाकरेंनीही आपण शिक्षण विभागापर्यंत ही मागणी पोहचवू असं म्हटलं होतं. दरम्यान कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या आधी दहा मिनिटं पेपर देण्याचा नियम यंदापासून बोर्डाने रद्द केला आहे. 10 मिनिटांचा वाढीव वेळ हा निर्धारित वेळेच्या नंतरचा आहे.  Maharashtra Board Exams 2023: पुण्यात परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक; जिल्हाधिकार्‍यांनी दिले इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे निर्देश .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा 2 मार्च पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये 11 वाजता आणि दुपारच्या सत्रामध्ये 3 वाजता सुरू होणार आहेत. पण विषयानुसार आता जसा पेपर असेल त्याच्या उत्तर पत्रिका सादर करण्याच्या वेळेमध्ये अधिकची 10 मिनिटं त्यांना दिली जाणार आहेत. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत.