HSC Exams 2023: विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका; इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12) परीक्षेअंतर्गत दि. 3 मार्च 2023 रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी 10.30 नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात 10.30 वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. 2.30 वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. 0037 अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: 'इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीमधून दिल्यास अशा मुलांना पुढे कोणीही रोजगार देणार नाही'- Ajit Pawar)

दरम्यान, दौंड मधील केडगावात शिक्षकांच्या मदतीने सामुहिक कॉपी झाली आहे. भरारी पथकाने धाड टाकल्याने हा प्रकार समोर आला. यामध्ये शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावच्या जवाहरलाल माध्यमिक विद्यालयामध्ये 12 वीची परीक्षा सुरू होती. त्यावेळेस परीक्षार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.