Online Application | Photo Credits: Pixabay.com

सुरूवातीला कोरोना संकट आणि नंतर मराठा आरक्षणाला स्थगिती यामुळे राज्यात यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया रेंगाळली होती. मात्र आता ही अखेरच्या टप्प्यांत आली आहे. अद्याप 11 वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी न झालेले, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच मिळालेले अ‍ॅडमिशन रद्द करून रिक्त जागेवर अ‍ॅडमिशन मिळवणयसाठी बुधवार 13 जानेवारी 2021 पासून प्रथम येणार्‍यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश (First Come, First Served Admission Round) दिला जाणार आहे. यासाठी दहावीच्या मार्कांच्या आधारे रिक्त जागांवर अकरावीसाठी प्रवेश दिला जाईल. ही फेरी म्हणजे यंदाच्या 11 वी प्रवेशाची विद्यार्थ्यांना शेवटची संधी आहे. Maharashtra SSC Exam Update : विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! दहावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; 'ही' आहे अंतिम तारीख.

मुंबई आणि महानगर परिसरामध्ये ज्युनियर कॉलेजसाठी सव्वा लाख जागा रिक्त आहेत. त्यावर आता विशेष प्रथम येणार्‍यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी 3 नियमित आणि 2 विशेष फेर्‍या यांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या भागात यावर्षी 1 लाख 96 हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 11 वीला प्रवेश घेतला आहे. अजूनही 1 लाख 24 हजार जागा बाकी आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो.यासाठी मार्कांनुसार पॉर्टलवर त्या तारखेला तुम्हांला अर्ज सादर करावा लागणार आहे.

11 वी प्रवेशासाठी कधी कोणासाठी असेल संधी?

13-15 जानेवारी – 90% पेक्षा जास्त गुण असणार्‍यांसाठी

16-18 जानेवारी – 80-100% गुण असणार्‍यांसाठी

19-20 जानेवारी – 70-100% गुण असणार्‍यांसाठी

21-22 जानेवारी – 60-100% गुण असणार्‍यांसाठी

23-25 जानेवारी – 50-100% गुण असणार्‍यांसाठी

27-28 जानेवारी – दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी

29-30 जानेवारी – ATKT विद्यार्थी

दरम्यान यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला पसंती दिल्याचं पहायला मिळालं आहे. यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया जानेवारी अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. काही ठिकाणी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले आहेत. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली आहे.