महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेकरीता 1 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक 1 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 28 डिसेंबर, 2021 रोजी 5 वाजल्यापासून दिनांक 1 जानेवारी, 2022 रोजी 11.59 वाजेपर्यंत असणार आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता दिनांक 4 ऑक्टोबर, 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार वयोमर्यादेची कमाल गणना तत्कालिन शासन नियमानुसार करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 17 डिसेंबर, 2021 अन्वये दिनांक 1 मार्च, 2020 ते दिनांक 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: MPSC Exam: आगामी 2 तारखेला होणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा पुढे ढकलली)
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक 1 जानेवारी, 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत असणार आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास, चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी 11.59 वाजेपर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 3 जानेवारी, 2022 बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरावे. विहित पद्धतीने व विहित कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येणार असल्याचेही भरणे यांनी सांगितले.