CBSE Board Exam 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षांसाठी परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी दिली आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. cbse.gov.in. अधिकृत नोटीसनुसार, विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्राकडून प्रॅक्टिकल आणि थिअरी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र बदलायचे आहे, त्यांना 25 मार्च 2021 पर्यंत शाळांमध्ये अर्ज पाठवावा लागेल.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या विनंत्या शाळांनी 31 मार्चपर्यंत सीबीएसई वेबसाइटवर अपलोड कराव्यात. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 च्या साथीमुळे दहावी-बारावीच्या काही विद्यार्थ्यांचे कुटुंब दुसर्या शहरात स्थलांतर झाले आहे. अशा परिस्थितीत, या विद्यार्थ्यांना आधी दिलेल्या केंद्रात प्रॅक्टिकल आणि थिअरी परीक्षेसाठी जाण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा विचार करून सीबीएसईने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात बदल करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार, आता विद्यार्थी त्यांच्या परीक्षा केंद्रात बदल करू शकतात. (वाचा - SSC and HSC Class Syllabus: अभ्यासक्रमात 50% कपात करावी यासाठी इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी आक्रमक)
बोर्ड परीक्षा केंद्र बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसईने रोल नंबर जारी केलेला असावा. यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित शाळेला विनंती करावी लागेल. याबरोबरचं विद्यार्थी ज्या शाळेतून परीक्षेला बसू इच्छितात त्या शाळेलाही यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. निर्धारित तारखेनंतर, कोणत्याही परिस्थितीत विनंती स्वीकारली जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन यासंदर्भात नोटीस तपासू शकता. सीबीएसईची 10 वीची परीक्षा 4 मे ते 7 जून 2021 पर्यंत घेण्यात येणार आहे आणि 12 वीची परीक्षा 4 मे ते 14 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे.