सीबीएसई बोर्डाचा (Central Board of Secondary Education) यंदाचा 10वी आणि 12वीचा निकाल यंदा 15 ऑगस्टपूर्वी लावण्याचा विचार असल्याचं केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल (Union HRD Minister Ramesh Pokhriyal) यांनी सांगितलं आहे. दरम्यान 10 वी आणि 12 वीचे निकाल काही दिवसांच्या फरकाने पाठोपाठ लावले जातील अशी माहितीदेखील Times of India च्या रिपोर्ट्समधून समोर आली आहे. CBSE 10th, 12th Board Exam 2020 Dates: सीबीएसई बोर्डाचं दहावी, बारावीचं नवं वेळापत्रक जाहीर cbse.nic.in वरून करा डाऊनलोड!
12 वीच्या विद्यार्थ्यांच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा आणि नॉर्थईस्ट दिल्ली भागातील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान घेतल्या जाणार आहे. सध्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा झालेल्या परीक्षांच्या विषयाचे पेपर तपासणीचं काम सुरू झाले असून उर्वरित विषयांच्या परीक्षा झाल्यानंतर महिन्याभरात निकाल लावले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, CBSE च्या शाळा ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.दरम्यान सरकारकडून ऑगस्ट महिन्यात देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल त्यानंतर नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतचा निर्णय होईल असे सांगण्यात आले आहे. विद्यापीठांचेदेखील याच काळामध्ये आगामी वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न असेल.
सीबीएसई बोर्डाने 18 मार्च नंतर रद्द केलेल्या परीक्षा आता पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला असला तरीही 41 विषयंपैकी महत्त्वाच्या 29 विषयांसाठीच आता परीक्षा होणार आहे.