Capgemini Recruitment 2021: खुशखबर! यंदा दिग्गज आयटी कंपनी कॅपजेमिनी भारतामध्ये देणार 30,000 लोकांना नोकऱ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मागच्यावर्षी कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) अनेक गोष्टी प्रभावित झाल्या होत्या. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्या उद्भवल्या होत्या. आता हळू हळू गोष्टी सुरळीत होत आहेत. आता फ्रान्सची माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) यावर्षी भारतात 30,000 कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 25% जास्त असेल. कंपनीने म्हटले आहे की ते भारतातील आपल्या अस्तित्वाचा आणखी फायदा घेऊ इच्छित आहेत. भारतातील कॅपजेमिनीचे मुख्य कार्यकारी अश्विन यार्डी यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, यावर्षी नवीन लोकांना कामावर घेतल्यामुळे आम्हाला कंपनीच्या महसुलात 7 ते 9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

या नोकरभरतीमध्ये 50 टक्के फ्रेशर्स आणि 50 टक्के लेटरलची नेमणूक करण्यात येणार आहे. मूळ पॅरिसची कंपनी कॅपजेमिनीसाठी भारत सर्वात मोठे टॅलेंट सेंटर आहे. कंपनीमध्ये एकूण 270,000 कर्मचारी कामावर आहे, यामध्ये केवळ भारतात कंपनीचे 125,000 कर्मचारी आहेत. कंपनीने गेल्या वर्षी भारतात सुमारे 24,000 लोकांना काम दिले होते.

यार्डी म्हणाले की, यंदाची भरती क्लाऊड, अभियांत्रिकी आणि संशोधन व विकास, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), 5 G, एज कॉम्प्यूटिंग आणि सायबर सिक्योरिटी यासारख्या उदयोन्मुख डिजिटल कौशल्यांवर आधारीत असेल. डिसेंबरच्या तिमाहीत कॅपेजेमिनीने डिजिटल आणि क्लाऊडमधून 65% महसूल मिळविला होता. (हेही वाचा: 'आरबीआय'मध्ये 841 पदांची नोकरभरती, 10 वी पासही करू शकतात अर्ज; जाणून घ्या पदांची नावे व कुठे कराल अप्लाय)

कॅपजेमिनीशिवाय इन्फोसिस लिमिटेड देखील त्यांच्या कर्मचारी संख्येमध्ये वाढ करणार आहे. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ही कंपनी 24,000 महाविद्यालयीन पदवीधरांना नोकरी देईल. दुसरीकडे, कॉग्निझंट तंत्रज्ञान सोल्यूशन्स कॉर्पोरेशनचे भारतात 200,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, आता कंपनीने यंदा 2021 मध्ये 23,000 हून अधिक लोकांना कामावर घेण्याची घोषणा केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 35% अधिक असेल.