Byju’s (संग्रहित संपादित प्रतिमा)

शिक्षण क्षेत्रातील ऑनलाइन शिक्षण देणारी बायजू (Byju) ही एक दिग्गज कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी कंपनीने मोठ्या खर्चात कपात करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, कंपनीने मार्च 2023 पर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागेल, असे कंपनीने म्हटले आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये कंत्राटी आणि पूर्णवेळ अशा दोन्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच नव्याने शिक्षक भरती करण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी सांगितले की, कंपनी आपल्या संघांमध्ये सुधारणा करण्याचे काम करत आहे. त्या म्हणाल्या की, कंपनी नवीन भागीदारीद्वारे परदेशात ब्रँडचा प्रचार करेल. यासोबतच भारतात आणि परदेशात व्यवसाय वाढवण्यासाठी 10,000 शिक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे.

सध्या कंपनी देशभरात नवीन पद्धतीने ब्रँडचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. K10 च्या उपकंपन्या Meritnation, TutorVista, Scholar आणि HashLearn आता भारतात एकत्र काम करतील असेही त्यांनी सांगितले. दिव्या गोकुलनाथ यांनी सांगितले की, येत्या सहा महिन्यांत कंपनी 5000 नवीन शिक्षकांची भरती करणार आहे. या शिक्षकांना इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांचे ज्ञान असेल. कंपनी लॅटिन अमेरिकन देशांमध्ये विस्ताराची योजना आखत आहे. (हेही वाचा: फ्रेशर्सना दिलेले ऑफर लेटर Wipro, Infosys आणि Tech Mahindra कडून रद्द; मुलाखती घेऊन नोकरभरती थांबवली)

कंपनीचा दावा आहे की, भारतभर त्यांची 200 हून अधिक सक्रिय केंद्रे आहेत. या वर्षाच्या अखेरीस ते 500 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2021-22 मध्ये, बायजूला 4,588 कोटी रुपयांचा तोटा झाला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्के अधिक आहे. बायजूचे सध्या सुमारे 50,000 कर्मचारी आहेत.