प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील सुप्रसिद्ध आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा (Wipro, Infosys and Tech Mahindra) यांनी फ्रेशर्सना ऑफर लेटर देऊन त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या आयटी कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑफर केलेल्या अनेक नोकरभरती रद्द केल्या आहेत. आयटी कंपन्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या तीन कंपन्यांसोबतच इतर अनेक कंपन्यांनीदेखील ऑफर लेटर दिल्यानंतर नोकरी देण्यास नकार दिला आहे.

आयटी कंपन्यांनी 3-4 महिन्यांसाठी नव्या नोकर भरतीवर बंदी घातली आहे. कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते हे काम करत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. अलीकडील अहवालात असे सूचित केले आहे की, इन्फोसिस, विप्रो आणि टेक महिंद्रा यांसारख्या आयटी कंपन्यांनी ऑनबोर्डिंग प्रक्रियेला काही महिने विलंब केल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलेली ऑफर लेटर रद्द केली आहेत. विद्यार्थ्यांचा दावा आहे की, त्यांनी सुमारे 3-4 महिन्यांपूर्वी टॉप टेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता.

मुलांची मुलाखत झाल्यावर त्यांना ऑफर लेटर देण्यात आले होते. मुले त्यांची नोकरी सुरू होण्याची वाट पाहत होते मात्र आता कंपन्यांनी या नोकऱ्या रद्द केल्या आहेत. टेक कंपन्यांनी पात्रता निकष आणि कंपनी मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे ही ऑफर लेटर रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात आली होती, ते कंपनीचे शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2023 वर्षातील आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जारी)

जगभर आयटी उद्योगात मंदीची चर्चा असताना हा प्रकार घडला आहे. फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल सारख्या मोठ्या कंपन्यांनीदेखील हायरिंग बंद केले आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही संस्थेने मंदीबद्दल औपचारिकपणे भाष्य केले नाही. मात्र जगभरातील आयटी कंपन्या ज्या पद्धतीने नोकऱ्या देणे थांबवत आहेत आणि नोकऱ्या काढून घेत आहेत, त्यावरून तज्ज्ञ नक्कीच मंदीचा अंदाज लावत आहेत.