World's Second Most Polluted City: दिल्ली ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर; कोलकाता आणि मुंबईचाही यादीत समावेश
Delhi Pollution (PC - PTI)

World's Second Most Polluted City: दिल्लीच्या प्रदूषणामुळे (Pollution) शहरातील नागरिकांना विविध आरोग्य समस्या जाणवत आहेत. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील रहिवासी प्रचंड नाराज आहेत. तथापि, गेल्या काही दिवसांत दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत (AQI पातळी) सुधारणा नोंदवली गेली. 13 फेब्रुवारीला नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, प्रदीर्घ काळानंतर दिल्ली जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीतून बाहेर पडले. ज्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेचे कौतुक केले. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांत दिल्ली पुन्हा एकदा जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये सामील झाले आहे. आता जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरामध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ताज्या आकडेवारीनुसार. दिल्लीतील हवा सतत खराब होत आहे. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता राजधानी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. या यादीत दिल्लीनंतर कोलकाता आणि मुंबईचा क्रमांक लागतो. 13 फेब्रुवारी रोजी दिल्ली पहिल्या 10 प्रदूषित शहरांच्या यादीत शेवटचे होते. ज्याचे कारण म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या दिवसांत झालेला पाऊस. पावसानंतर फेब्रुवारीच्या जोरदार वाऱ्यांमुळे राजधानीतील प्रदूषणही कमी झाले. पण, आता पुन्हा एकदा दिल्लीत प्रदूषण वाढत आहे. (हेही वाचा - African Cheetahs Will Come in India: आज दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात येणार; Kuno National Park मध्ये तयारी पूर्ण)

ग्रीनपीसचे अविनाश चंचल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीला रिमझिम पाऊस पडला, जो 30 जानेवारीपर्यंत सुरू होता. यानंतर 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान जोरदार वारे वाहू लागले. पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे प्रदूषणात कमालीची घट झाली. या कारणास्तव, त्या काळात राजधानी जगातील अनेक शहरांपासून स्वच्छ राहिली.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) चे विश्लेषक सुनील दहिया यांनी सांगितले की, पाऊस आणि जोरदार वारे राजधानीचे प्रदूषण कमी करतात. याच कारणामुळे राजधानी दिल्ली पावसाळ्यात सर्वात कमी प्रदूषित असते. राजधानीत प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी काम करण्यात येत आहे. परंतु तरीही प्रदूषण निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहे. शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना आखणे आवश्यक आहे.