Delhi Assembly Election 2020: भाजपची जय्यत तयारी; नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील 10 दिग्गज नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार
BJP Leaders (Photo Credit: PTI)

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 (Delhi Assembly Election 2020) येत्या 8 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून  11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) पक्षाने दिल्ली काबीज करण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. भाजपकडून आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांना आव्हान देण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांच्यासह महाराष्ट्रातील 10 नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे भाजपच्या नव्या भुमिकेचा पक्षाला फायदा होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, दुसरीकडे केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त राखण्यासाठी कंबर कसली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळवूनही भाजपला राज्यात सरकार स्थापन करता आले नाही. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षासमोर आप  आणि काँग्रेसचे  कडवे आव्हान असणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील 10 दिग्गज नेते आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरवले आहेत. दिल्लीतील चौका- चौकात महाराष्ट्रातील या नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज दक्षिण दिल्लीत 3 सभा होणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या दिग्गज नेत्यांच्या सभा दिल्लीत आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपच्या अनोख्या प्रचाराचा पक्षाला किती फायदा पोहचणार? हे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच समोर येईल. हे देखील वाचा- Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

भाजप 10 मोठ्या मुद्द्यांवर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या बैठकीत 10 मुद्द्यांवर प्रामुखपणे जोर दिला जात आहे. यात सर्जिकल स्ट्राईक, अनुच्छेद 370, नागरिकत्व दुरूस्ती कायदा यांसारख्या अनेक मुंद्यांचा समावेश आहे.