Hanging (Photo Credits: Representative Image)

कोरोना व्हासरसने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने 180 हून अधिक देशात थैमान घातला आहे. भारतातही कोरोनाबाधीत लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच साधा ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने आपल्यालाही कोरोनाची लागण झाली आहे, असा गैरसमज मनात ठेऊन उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Suicide) माहिती समोर आली आहे. ही घटना कानपूर (Kanpur) बिनौर गावात मंगळवारी घडली. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

कोरोना व्हायरसने सुरूवातीला चीनमधील वुहान येथे धुमाकूळ घातला. त्यानंतर इटली, इराण, स्पेन मध्येही कोरोना व्हायरसची लागण होऊन हजारो लाकोंचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन गेल्या 3 महिन्यात 16 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता भारतातही कोरोना बाधीत लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे देशात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच कानपूर येथे ताप आणि खोकल्याचा त्रास असल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित तरुणाने ही आत्महत्या कोरोनो व्हायरसची लागण होण्याच्या भितीने केली आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. या तरूणाला कोरोना व्हायरसची लागण की नाही शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे पहिल्या टप्प्यातील जनगणना 2021 आणि NPR चे कार्य पुढील आदेशापर्यंत स्थगित

धक्कादायक म्हणजे, कोरोना व्हायरसच्या भितीने उत्तर प्रदेशमध्ये आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे. याआधीही हापूर आणि बरेली येथे दोन वेगवगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी आठवड्याच्या शेवटी आत्महत्या केली होती. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षित राहावे, घाबरू नये असे आवाहन केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. एवढेच नव्हेतर कोरोना हा बरा होणारा आजारा आहे, असेही सांगितले जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्यापैंकी 40 लोक बरे झाल्याचे समजत आहे.