भारतीय लष्कर आणि चिनी लष्करातील सैनिकांमध्ये 15 जून रोजी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे 43 जवान ठार तसेच जखमी झाले होते. मात्र, भारत चीनदरम्यानच्याया संघर्षानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’असे कॅप्शन देत कॉंग्रेस नेते राहुल गांधी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. चीन ने भारताची जमीन घेतली असेल तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे कबुली द्यावी. चीनविरोधातील लढ्यात संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. आपल्या जमीनीवरून त्यांना हकलवून लावू फक्त तुम्ही खरे काय ते सांगा, असे आवाहन राहुल गांधी यांनी नरेद्र मोदी यांना केले आहे.
चीन आणि भारतात सुरु असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण भारत पेटून उठला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात त्यांनी भारत आणि चीन यांच्या संघर्षाबाबत चर्चा केली आहे. भारताच्या शहिद जवानांना अभिवादन करत राहुल गांधी म्हणाले की, भारताची एक इंच जमीन कोणी घेतलेले नाही, असे मोदींनी सांगितले होते. मात्र, चीनने आपला भूभाग ताब्यात घेतला आहे, असे उपग्रहांनी काढलेल्या फोटो, लडाखमधील नागरिक आणि लष्करातील निवृत्त जनरलही सांगत आहेत. एका जागेवर नव्हेच तर, 3 जागी चीनने आपला भूभाग बळकावला आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधानजी, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण देशाला खरे सांगावे लागेल. तुम्हाला खरे बोलावे लागेल. जर तुम्ही म्हणालात की, जमीन घेतली नाही आणि जमीन घेतली असेल तर चीनचा फायदा होईल. आपल्याला यांच्याविरोधात एकत्र लढायचे आहे. त्यांना बाहेर हकलवून लावायचे आहे. त्यामुळे न घाबरता तुम्ही बोलावे. जमीन घेतली असेल तर सांगा की हो चीनने जमीन घेतली आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Jammu-Kashmir: अनंतनागमध्ये CRPF टीमवर दहशतवादी हल्ला; सीआरपीएफचा एक जवान शाहिद, 5 वर्षीय मुलाचा मृत्यू
राहुल गांधी यांचे ट्विट-
प्रधानमंत्री जी,
देश आपसे सच सुनना चाहता है।#SpeakUpForOurJawans pic.twitter.com/tY9dvsqp4N
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 26, 2020
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही याआधी चिनी सैन्याच्या घुसघोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कॉंग्रेसने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर घुसखोरीला स्पष्ट उत्तर न दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील परिस्थिती स्पष्ट करून सरकार देशाला विश्वासात घेईल का? असा सवाल त्यांनी केला होता.