Jammu-Kashmir: अनंतनागमध्ये CRPF टीमवर दहशतवादी हल्ला; सीआरपीएफचा एक जवान शाहिद, 5 वर्षीय मुलाचा मृत्यू
Indian Army | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या (Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यातील बिजबेहारा येथे दहशतवाद्यांनी CRPF जवानांच्या पथकावर हल्ला केला. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक (सीआरपीएफ) जवान आणि पाच वर्षाचा एक मुलगा ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राप्त माहितीनुसार सुरक्षा कर्मचारी अनंतनागच्या बिजबेहारा येथे गस्त घालत होते, त्याचवेळी मोटार-सायकलवर सशस्त्र दहशतवाद्यांनी येऊन जवानांच्या पथकावर हल्ला केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांकडून गोळ्या झाडण्यात आल्या परंतु दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली आहे. याच वेळी, एका 5 वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला. “अनंतनाग येथील बिजबेहारा (Bijbehara) येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर गोळीबार केला आणि एका अल्पवयीन मुलाचा आणि सीआरपीएफच्या जवानांचा मृत्यू झाला. क्षेत्र घेरले. गुन्हा दाखल,” पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली. न्यूज एजन्सी PTI ने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास बिजबेहरा परिसरातील पाडशाही बाग पुलाजवळ सीआरपीएफच्या 90 बटालियनच्या रोड ओपनिंग पार्टीमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. (जम्मू काश्मीर: त्राल येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 1 दहशतवाद्याचा खात्मा; शोधमोहिम सुरु)

हल्ल्यात सीआरपीएफचा जवान आणि मुलगा जखमी झाले ज्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले जेथे दोघांचा मृत्यू झाला, अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की सुरक्षा दलाने परिसर घेरला आहे आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या बंदुकीच्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या माध्यमातून शुक्रवारी किमान दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल परिसरातील चेवा उल्लार येथे जवानांनी तीन दहशतावाद्यांचा खात्मा केला आहे. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्राल परिसरात काल संध्याकाळपासून चकमक सुरू झाली होती आणि अखेर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.