काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मुंबई कोर्टाने (Mumbai Court) समन्स (Summons) जारी केले आहे. त्यानुसार, राहुल गांधी यांना येत्या 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपणी करत मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
राहुल गांधी यांनी मोदींना 'कमांडर इन थिफ', असे संबोधत ट्विट केले होते. याप्रकरणी भाजप नेते महेश श्रीश्रीमल यांनी न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार, 15 फेब्रुवारीपर्यंत आरोपांना उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (हेही वाचा - सांगली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; महापौरपदी भाजपच्या गीता सुतार यांची निवड)
राहुल गांधी यांनी केवळ पंतप्रधानांची नव्हे तर पक्षाच्या सदस्यांचीही बदनामी केल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी केला आहे. कलम 499 आणि 500 अन्वय असलेल्या आरोपांविषयी न्यायालयाने राहुल गांधीकडे उत्तर मागितले आहे. त्यासाठी न्यायालयाने राहुल गांधी यांच्या नावाने समन्स जारी केले आहे.