ट्विटरची 'ब्ल्यू टीक' सांगा कोणाची? भाजपतील महाजन विरुद्ध मालवीय वाद मोदी, शाहांच्या कोर्टात
भाजपमध्ये अंतर्गत कलह वाद मोदी, शाहांच्या कोर्टात (संग्रहित, संपादित प्रतिमा)

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरकडून ट्विटर खात्याच्या अधिकृततेबाबत दिल्या जाणाऱ्या 'ब्ल्यू टीक'वरुन भारतीय जनता पक्षाच्या दोन युवा नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. खासदार पूनम महाजन आणि अमित मालवीय अशी या दोन नेत्यांची नावे आहेत. पैकी, पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाचे नेतृत्व करतात तर, अमित मालवीय हे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत. पदाधिकाऱ्यांच्या ट्विटर खात्याला ट्विटरकडून अधिकृततेचा दर्जा असलेली 'ब्ल्यू टीक' मिळवण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. हा वाद अत्यंत टोकाला गेला असून, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचल्याचे समजते. भाजप युवा मोर्चाने तर पंतप्रधान मोदी आणि शाह यांना थेट पत्र लिहून अमित मालवीय हे अहंकारी असल्याचे म्हटले आहे, असे वृत्त आहे.

अमित मालवीय यांनी ट्विटरला कळवले की, भाजपच्या आयटी सेलकडून अधिकृतपणे सांगितले जात नाही तोपर्यंत भाजपच्या कोणाही व्यक्ती अथवा पदाधिकाऱ्याच्या ट्विटर खात्याला अधिकृततेचा दर्जा असलेली 'ब्ल्यू टीक' देऊ नये. मालवीय यांच्या निर्देशामुळे कारवाई करत ट्विटरने भाजप युवा मोर्चाच्या सुमारे ८ पदाधिकाऱ्याच्या ट्विटर खात्याला अधिकृततेचा दर्जा मिळालेली 'ब्ल्यू टीक' काढून घेतली. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची ट्विटर हॅंडल्स डी व्हेरीफाय झाली. त्यानंतर १३ ऑक्टोबरपासून मालवीय विरुद्ध पूनम महाजन असा वाद सुरु झाला.

दरम्यान, ट्विटरने महाजन यांच्या निर्देशनानंतर युवा मोर्चाच्या काही ट्विटर हॅडल्सना व्हेरीफाय केले. तर मालवीय यांच्या कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, 'ही ट्विटर अकाऊंट्स भाजपच्या अंतर्गत चौकशीशिवाय व्हेरीफाय करण्यात आली आहेत'. त्यानंर मालवीय यांच्या कार्यालयाने ट्विटरला २२ ट्विटर खाती डी व्हेरीफाय करण्यास सांगितले. त्यानंतर पूनम महाजन यांनी ट्विटरशी संपर्क केला. दरम्यान, ट्विटरने मानक प्रक्रियेसाठी (ब्ल्यू टीक मिळविण्यासाठी) आपल्याला मालवीय यांच्या कार्यालयामार्फत यावे लागेल, असे महाजन यांना सांगितल्याचे समजते. त्यानंतर ८ ट्विटर हॅंडल डी व्हेरीफाय करण्यात आली. या आठमध्ये भाजप युवा मोर्चा आयटी सेलचे राष्ट्रीय प्रभारी कपिल परमार, राष्ट्रीय प्रभारी (कायदेशीर) चारु प्रज्ञा, मीडिया प्रभारी शवम छाबरा, देवांग दवे, प्रिया शर्मा आणि अनंत प्रकाश यांचा समावेश असल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे. (हेही वाचा,'एमआयएम'नंतर प्रकाश आंबेडकरांचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध)

दरम्यान, भाजप युवा मोर्चाची गुजरात, बिहार, छत्तीसगढ, हरियाणा, झारखंड, राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेश यांसह अनेक राज्यांची ट्विटर हॅंडलही डी व्हेरीफाय झाली आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनाच पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. पक्षातील एकजूट तोडण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केल्याचा दावा या पत्रात केल्याचे समजते.काही पदाधिकाऱ्यांनी मालविय यांचा अहंकार दुखावला असल्यानेच त्यांनी हे वर्तन केल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, वर्तमान स्थितीत देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तर, आगामी वर्षात लोकसभेच्या निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांना सांभाळून घेताना पंतप्रधानांसह पक्षाच्या अध्यक्षांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या वादावर मोदी, शाह कसा तोडगा काढणार याबाबत उत्सुकता आहे.