बिहार (Bihar) येथे एक व्यक्तीने आपली पत्नी आणि तीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोतिहारी येथे ही पतीने पत्नी आणि तीन मुलींची गळा चिरून हत्या केली आणि तेथून पळून गेला. हे प्रकरण पहारपूरच्या बावरिया गावातील आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. घटनेनंतर याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, गुरुवारी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर आरोपीने पत्नी व मुलींना जेवणात अंमली पदार्थ मिसळून बेशुद्ध केले. यानंतर त्यांची एक एक करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
अरेराजचे एसडीपीओ रंजन कुमार यांनी सांगितले की, पतीने पत्नी आणि तीन मुलींची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीच्या शोधासाठी तपास पथक तैनात करण्यात आले आहे. रंजन कुमार यांनी पुढे सांगितले की, आरोपी पती इदू मिया हा विक्षिप्त प्रकारचा आहे. यापूर्वीही त्याने आपल्या एका मुलीची हत्या केली होती. त्याने आपल्या मुलीला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले होते. या कारणामुळे तो बराच काळ तुरुंगात राहिला.
साधारण महिन्याभरापूर्वी तो यूपीच्या सीतापूर कारागृहातून जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो आपल्या पत्नीसोबत राहत होता. या व्यक्तीने आपल्या कुटुंबाला कशामुळे मारले हे स्पष्ट झालेले नाही. अहवालानुसार, जोडप्याच्या लग्नाला 17 वर्षे झाली होती मात्र त्यांना चारही मुलीच झाल्या. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे व याच रागातून त्याने या हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.