Bihar: प्रेमी जोडप्याचे लग्नाच्या पहिल्याच रात्री धक्कादायक कृत्य; दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू, बिहार येथील घटना
Hospital (Photo Credits: IANS)

बिहारच्या (Bihar) गोपाळगंज (Gopalganj) येथे प्रेम विवाह करणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पहिल्याच रात्री आमहत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर गोरखपूरमधील (Gorakhpur) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या पहिल्याच रात्री या दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचा काहीच अंदाज त्यांच्या नातेवाईकांना नाही. याप्रकरणी मीरगंज पोलिसांनी (Mirganj Police) पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार सिंह (वय, 30) आणि शांती देवी (वय, 28) असे नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. या दोघांनी शनिवारी (19 जून) थावे मंदीर येथे लग्न केले. लग्न केल्यानंतर रविवारी (20 जून) प्रथेप्रमाणे बहुभोजनाचा कार्यक्रम करण्यात आले. नातेवाईकांचा पाहुणचार केल्यानंतर सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर त्या रात्री दोघेही आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले. परंतु, दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना दोघेही जण त्यांच्या बेडरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. दोघांनी विष खाल्ल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी या दाम्पत्याला उलटी व्हावी म्हणून मिठाचे पाणी पाजले. मात्र, उलटी न झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना चांगल्या उपचारासाठी गोरखपुर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Madhya Pradesh: अल्पवयीन मुलाकडून विवाहित महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या जोडप्याने कार्यक्रमासाठी बनवलेल्या चिकनच्या डिशमध्ये विष मिसळून खाल्ल्याची शंका नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणामध्ये आता प्रेमी जोडप्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याची वाट पोलीस पाहत आहेत. त्यानंतरच  पुढील चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या पहिल्याच रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.