Bihar Assembly Elections 2020: भोजपुर हादरले! बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची गोळ्या झाडून हत्या
फोटो सौजन्य - Pixaboy

बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election 2020) मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटेनेने संपूर्ण भोजपूर (Bhojpur) जिल्हा हादरून गेला आहे. टाऊन पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या सुंदरनगर (Sundernagar) परिसरामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत व्यक्ती आणि त्यांच्या भावामध्ये एक वर्षांपासून जमीनीचा वाद सुरु आहे. अशी माहिती मृताच्या मुलाने दिली आहे. मात्र, हत्या कोणी केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणामध्ये सध्या तपासासाठी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

प्रीतम नारायण सिंह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रीतम यांच्या पत्नी शहरातील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा असून त्या स्थानिक राजकारणामध्ये खूपच सक्रीय आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी अगदी प्रचारापासून ते सभांपर्यंत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या काम करत होत्या. दरम्यान, त्यांचे पती प्रीतम हे सोमवारी सायंकाळी बाईकवरून घरी परत असताना सुंदर नगर परिसरातील मंदिराजवळ दोन बाईकस्वारांनी त्यांना रस्त्यात अडवून त्यांची चौकशी करू लागले. प्रीतम हे त्यांच्याशी बोलत असतानाच अचानक त्यांनी प्रीतम यांच्यावर गोळीबार केला. यात प्रीतम गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यांना दुसरीकडे हलवण्याची तयारी करण्यात आली. परंतु, दुर्देवाने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती न्यूज 18 ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Bihar Election Results 2020: बिहार मध्ये चिराग पासवान ठरणार का किंगमेकर? कलांमधील UPA-NDA च्या कांटे की टक्कर मध्ये LJP बजावू शकते महत्त्वाची भूमिका

प्रीतम यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरु असून या प्रकरणामध्ये लवकरच आम्ही दोषींना ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशियितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाआधीच ही घटना घडल्याने शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.