Begum Bazaar Honour Killing: हैदराबादमध्ये पुन्हा ऑनर किलिंगचे प्रकरण; आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाची निर्घृण हत्या
Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

Begum Bazaar Honour Killing: हैदराबादमध्ये आणखी एक ऑनर किलिंग प्रकरण (Honour Killing Case) उघडकीस आले असून आंतरजातीय प्रेमविवाहावरून 24 वर्षीय तरुणाची त्याच्याच वडिलांसमोर हत्या करण्यात आली आहे. शाहिनयथगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेगम बाजार परिसरातील मासळी बाजाराजवळ शुक्रवारी रात्री नीरजकुमार पनवर (वय, 22) यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

दुकान बंद करून नीरज कुमार वडील राजेंद्र पनवर यांच्यासोबत घरी परतत होते. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर ग्रेनाईट दगडाने वार केले. नीरज खाली पडताच त्यांनी त्याच्यावर चाकूने वार केले. (हेही वाचा - Murder: वडिलांच्या उपस्थितीत 24 वर्षीय‌ मुलाची हत्या, गुन्ह्यात तरुणाच्या सासरच्या लोकांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय)

नीरजकुमार पनवर यांचा त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या संजना (वय, 20) हिच्यासोबत दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. संजना दुसऱ्या जातीतील होती. सुमारे दीड महिन्यापूर्वी त्यांना मुलगा झाला होता. संजनाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. संजनाचे कुटुंबिय गेल्या सहा महिन्यांपासून नीरजला मारण्याचा कट रचत होते. आठवडाभर ते नीरजच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी खराब हवामानामुळे रस्त्यावर फारसे लोक नव्हते. त्यामुळे त्याने कट अंमलात आणण्याचे ठरवले.

दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी नीरजवर हल्ला करून पळ काढला. पोलिसांनी नीरजला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी लोकांनी जोरदार निदर्शने केली. त्यांनी शनिवारी बेगम बाजार बंदची हाक दिली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चार आरोपींना अटक केली. मृताच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, नीरजला त्याच्या पत्नीच्या कुटुंबाकडून जीवाला धोका असल्याने त्याने एक वर्षापूर्वी संरक्षणासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती.