Anna Hazare | (Photo credits: file photo)

Anna Hazare Reaction on Arvind Kejriwal Resignation: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. 177 दिवसांचा तुरुंगवास त्यांनी तिहारमध्ये भोगला. त्यानंतर अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी बाहेर येताच पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीतल्या जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील. असे म्हटले. या संपूर्ण प्रकारावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare)यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (हेही वाचा: Who Will Replace Arvind Kejriwal: दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा, कैलाश गहलोत, संजय सिंग या नेत्‍यांची नावे चर्चेत)

ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे यांनी म्हटलं की, 'मी अरविंद केजरीवाल यांना राजकारणात जाण्यास मनाई केली होती. मी त्यांना आधीच म्हटलं होतं की राजकारणात नका जाऊ. त्याऐवजी समाजाची सेवा करा. जनतेची सेवा करून खूप मोठे व्हाल. आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो. त्यावेळी मी केजरीवाल यांना अनेकदा म्हटलं होतं की राजकारणात जाऊ नका. समाजसेवेतूनच खरा आनंद प्राप्त होतो. परंतु, त्यांनी माझं ऐकलं नाही, त्यांना त्या गोष्टी कदाचित पटल्या नसतील. त्यामुळे आज जे व्हायचं ते झालं आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते मला माहिती नाही.', असे अण्णा हजारे म्हणाले.

दिल्लीत निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. अरविंद केजरीवाल यांनी ठासून सांगितले की, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. जोपर्यंत जनता निकाल जाहीर करत नाही तोपर्यंत मी त्या खुर्चीवर बसणार नाही. मला कोर्टातून कायदेशीर न्याय मिळाला, आता जनतेच्या कोर्टातून न्याय मिळेल याची खात्री आहे. जनतेच्या आदेशानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन, असे केजरीवाल म्हणाले.