Ajit Pawar on BJP's Victory: नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, अजित पवार यांची स्तुतीसुमने
Ajit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Ajit Pawar on PM Narendra Modi: राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP) घवघवीत यश मिळत असल्याचे पाहून त्यांच्या मित्रपक्षांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. उल्लेखनीय असे की, त्यांनी नामोल्लेख टाळत आपले काका शरद पवार यांनाही टोला लगावला आहे. काहींना आमचा निर्णय पटला नाही. पण देशाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे उद्गार त्यांनी काढले आहेत.

'काँग्रेसने अभाविपचा कार्यकर्ता पळवला'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट, दावे आणि आरोप केले होते. त्याला शरद पवार यांनी पुणे येथील बैठक आणि पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले होते. तोच धाका पकडत अजित पवार यांनी मोदींचे कौतुक करताना जुन्या नेत्यांना टोला लगावला आहे. दरम्यान, तेलंगणामध्येही काँग्रेसने अभाविपचा कार्यकर्ता पळवला, अन्यथा तिथेही वेगळे चित्र दिसले असते. या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे नरेंद्र मोदी हाच भाजपचा खरा चेहरा असल्याचे त्रिवार सत्य आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sharad Pawar on Ajit Pawar: 'तक्रार एकच आहे', शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल सांगितली मनातली गोष्ट)

'पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणे हा रडीचा डाव'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशाची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका असलेल्या सर्वच राज्यांमध्ये निकाल चांगला येईल, असे मी आगोदरच सांगितले होते. आता मात्र, इंडिया, इंडियावाले म्हणतील की, हे सगळे इव्हीएममुळेच घडले. पण वास्तवात तसे काही नाही, आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणे हा रडीचा डाव आहे. विरोधकांना अद्याप हे देखील ठरविण्यात आले नाही की, नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोणता उमेदवार असणार आहे. इव्हीएम घोटाळा करणे शक्य नाही. जनतेने दिलेला कौल मान्य करायला हवा, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sharad Pawar on NCP Dispute: संघटना स्वच्छ झाली, निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल- शरद पवार)

'खोटं बोलून राजकारण करता येत नाही'

मी अनेक वर्षे सत्तेत राहिलो आहे. मला खोटं बोलून राजकारण करता येत नाही. नुकतेच आम्ही कर्जतमध्ये शिबीर घेतले. त्यावर प्रतिक्रिया देताना वरिष्ठांनी प्रतिक्रिया दिली. पण आम्ही सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करतो आहोत. तसे, त्यांना प्रतिनिधित्वही दिले आहे. आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोत चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच, महाराष्ट्र एक नंबर करण्याचेही काम करतो आहोत. मात्र, आमचा निर्णय काहींना पटला नाही. पण मोदींना देशात पर्याय नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.