Ahmedabad: जोधपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल ३३ वर्षीय उपविभागीय दंडाधिकारीचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजस्थान प्रशासकीय सेवा (आरएएस) अधिकारी प्रियंका बिश्नोई यांच्या पोटात दुखत होते आणि वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्या गर्भाशयात एक गाठ आढळून आली. त्यांनी सांगितले की, यानंतर प्रियंकाची 5 सप्टेंबर रोजी जोधपूरमधील एका खासगी रुग्णालयात हिस्टेरेक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) करण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 6 सप्टेंबर रोजी प्रियंकाची प्रकृती बिघडल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला दुसऱ्या दिवशी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांनी सांगितले की, प्रियंकावर 13 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र बुधवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. हे देखील वाचा: Singer Ruksana Bano Dies: गायिका रुक्साना बानो हिचा वयाच्या 27 व्या वर्षी मृत्यू; कुटुंबीयांना विषबाधेचा संशय
अधिकाऱ्याने सांगितले की, प्रियंकाच्या कुटुंबीयांनी जोधपूर रुग्णालयाच्या डॉक्टरांवर ऑपरेशन दरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, या घटनेनंतर लोकांनी निदर्शने केली आणि जोधपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) बाहेर बिश्नोई समाजाच्या लोकांसह काही लोक जमले. आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी त्यांनी केली.
अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना सांगितले की, शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोलिस पथकाचा तपास अहवाल प्राप्त केल्यानंतरच गुन्हा नोंदवू शकतात. यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य करण्यात आले आणि सुमारे साडेचार तासानंतर आंदोलन संपले. यानंतर प्रियंकाचे कुटुंबीय आणि बिष्णोई समाजाच्या लोकांनी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी फलोदी येथील सुरपुरा येथे नेले. दरम्यान, लोकांचा रोष पाहता जोधपूर रुग्णालय आणि त्याच्या संचालकांच्या निवासस्थानीही रात्री उशिरा सुरक्षा वाढवण्यात आली होती.