Singer Ruksana Bano | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम ओडिशातील (Odisha) प्रसिद्ध संबलपुरी गायिका (Sambalpuri Singer) रुक्साणा बानो (Ruksana Bano) यांचे बुधवारी रात्री एम्स भुवनेश्वर (AIIMS Bhubaneswar) येथे उपचारादरम्यान निधन झाले. 27 वर्षीय कलाकार स्क्रब टायफसवर उपचार घेत होती, अशी माहिती आहे. परंतु रुग्णालयात अद्याप मृत्यूचे नेमके कारण निश्चित झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. रुक्सानाच्या कुटुंबाने तिच्या मृत्यूबद्दल पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. तिची आई आणि बहीणने दावा केलाआहे की, पश्चिम ओडिशाच्या प्रतिस्पर्धी गायकाने तिच्यावर विषप्रयोग केला असावा. तिला विष देण्यात आले असावे.

रुक्सनाला अज्ञातांकडून धमक्या

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्सानाला पूर्वी धमक्या मिळाल्या होत्या. तिची बहीण रुबी बानो यांनी पत्रकारांना सांगितले की, तिला वारंवार धमक्या येत असत. आम्हाला संशय आहे की, तिच्या प्रतिस्पर्धी कलाकारांनी तिला विष खायला घातले असावे. मात्र, रुबी बानो यांनी कथित प्रतिस्पर्धी कलाकाराची ओळख उघड केली नाही. रुबी बानो यांच्या म्हणण्यानुसार, 15 दिवसांपूर्वी बोलंगिरमध्ये शूटिंग करत असताना रुक्सानाच्या आरोग्यात अचानक बदल झाला. काही रस प्यायल्यानंतर ती आजारी पडली आणि 27 ऑगस्ट रोजी तिला भवानीपट्टण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती बिघडत असताना तिला बोलंगीर येथील भीमा भोई मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आणि नंतर तिला बरगड येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला पुढील उपचारासाठी भुवनेश्वरच्या एम्समध्ये हलवण्यात आले. दरम्यान, तिचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु

गायिकेच्या आईने देखील एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे, ज्यामध्ये विषबाधाच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आणि लोकांमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान,पोलिस अथवा रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कुटुंबियांच्या आरोपांवर कोणतेही भाष्य केले नाही. परंतु तरुण गायिकेच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि संगित वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मृत्यूबाबत तपास सुरु असून, तपासाअंती मृत्यूच्या कारणांचा तपशील पुढे येण्याची शक्यता आहे.