ऐकावं ते नवलचं! डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्गातील झोपड्या झाकण्यासाठी अहमदाबाद महापालिकेने बांधली भिंत; पहा फोटो
Ahmedabad Municipal Corp is building a wall in front of slum (ANI)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारत दौर्‍यावर येणार आहेत. ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी दिवशी ते नवी दिल्ली आणि गुजरात मधील अहमदाबाद शहराला (Ahmedabad City) भेट देणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या मार्गातील झोपड्या (Slum) झाकण्यासाठी एक खास भिंत (Wall) बांधण्याचं काम सध्या अहमदाबादमध्ये सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ (Sardar Vallabhbhai Patel International Airport) आणि इंदिरा ब्रिज (Indira Bridge) या भागात झोपड्या दिसू नयेत, यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेने भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा रोड शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांना या मार्गातील झोपड्या दिसू नये, यासाठी भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत अर्धा किलोमीटरची भिंत बांधण्याचे काम झाले आहे. या भिंतीची उंची 6 ते 7 फूट असणार आहे. सध्या सोशल मीडियावर या भितींचे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या भितींचे फोटो काही शेअर केले आहेत. (हेही वाचा - US राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन होण्याची शक्यता; जाणून घ्या वैशिष्ट्ये)

दरम्यान, अहमदाबाद महापालिकेच्या महापौर बिजल पटेल यांनी 'मला अशा प्रकारच्या कोणत्याही बांधकामाची माहिती नाही. तसचं मी अशी कोणतीही भिंत बांधताना पाहिली नाही, असं म्हटलं आहे. परंतु, यासंदर्भात बिजल पटेल यांनी पुष्टी केली नसली तरी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमधून भिंतीचं काम सुरू असलेलं स्पष्ट दिसतं आहे. तसचं गुजरातमधील काही विरोधी पक्षाकडून यावर टीकाही केली जात आहे.