केरळ बंद (Photo credit : ANI)

केरळमधील प्रसिध्द ‘शबरीमाला मंदिरा'त (Sabarimala Temple) बुधवारी पहाटे 40 वर्षांच्या दोन महिलांनी प्रवेश केला. या ऐतिहासिक घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. सर्वोच्च न्यायालयाने या मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला परवानगी देऊनही मंदिराचे पुजारी आणि स्थानिक लोक यांनी या मंदिरातील स्त्रियांचा प्रवेश नाकारला. याबाबतील देशात आंदोलनही घडले. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही देखील या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात त्यांना अपयश आले. आता या दोन महिलांच्या प्रवेशानंतर, यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडून आज राज्यात काळा दिवस साजरा करण्यात येत असून केरळ बंदची हाक देण्यात आली आहे.

बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे असून, बुधवारी पहाटे 3:45 वाजता त्यानी अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले. ही गोष्ट समोर येताच या गोष्टीला कडाडून विरोध करीत, मंदिर ताबडतोब शुद्धीकरणासाठी बंद करण्यात आले. केरळमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. स्थानिक संस्था आणि संघटनांनी या घटनेचा विरोध करत आज ‘केरळ बंद’ पुकारला आहे. या घटनेविरोधात ठिकठिकाणी दंगे घडत आहेत. या गोंधळसदृश्य परिस्थितीत एकाचा मृत्यु झाल्याचीही माहिती आहे. (हेही वाचा : केरळच्या Sabarimala Temple बद्दल या ’11’ इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!)

शबरीमाला कृती समितीने हा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या घटनेविरोधात कोचीमध्ये भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. केरळ भाजपा अध्यक्ष पी.एस.श्रीधरन पिल्लाई यांनी कायद्याचे पालन करुन शांततेत आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. तर हिंदू लोकांवर दिवसाढवळ्या केलेला बलात्कार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. बुधवारपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बुधवारीच अनेक ठिकाणी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आली होती. तसेच सरकारी मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले होते. आज संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर हा बंद पाळण्यात येत आहे.