तब्बल 75 वर्षांनतर दोन सैनिकांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; 1944 च्या युद्धात झाले होते बेपत्ता, इटलीत मिळाले सांगाडे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit Youtube)

मृत्यूच्या 75 वर्षानंतर साता समुद्रा पार इटली (Italy) देशातून दोन शहीद जवानांच्या भारतात आलेल्या अस्थींचे, विधिवत गंगेत (Ganges) विसर्जन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य मिळण्याआधी हे दोन्ही जवान बेपत्ता झाले होते. भारत सरकारकडून आतापर्यंत काहीच मिळाले नसले तरी, अखेर आपल्या मातीत आपल्या अस्थींचे विसर्जन झाल्याचे सुख यांना मिळाले आहे. Live हिंदुस्तान.Com ने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणाच्या झज्झर गावाचे रहिवासी असलेल्या व्यक्तीने माहिती दिली की, त्यांचे काका हरि सिंह 1942 मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यांचे वडीलही आपल्या भावासोबत होते. त्यांचे काका एफएफ रायफल्समध्ये भरती झाले होते, ज्यांना इंग्रजांनी जर्मनीसोबत युद्धासाठी इटलीला पाठवले होते. 17व्या वर्षी त्यांचे काका सैन्यात भरती झाले होते. 20 वर्षांचे असताना 1944 मध्ये इटली-जर्मनी युधावेळी ते बेपत्ता झाले.

1947 मध्ये सैन्याचा फ्रंट पाकिस्तानमध्ये गेला. जिथून सैनिकांचे रेकॉर्ड पेपर ग्रेनेजियर्स जबलपुरला पाठविले गेले. या रेकॉर्डमध्ये हिसारचे कालू राम आणि रोहतकचे हरि सिंह बेपत्ता असल्याचे दर्शवण्यात आले होते. 1996 साली इटलीमध्ये मातीत गाडले गेलेले काही मानवी सांगाडे सापडले होते. या सांगाड्यांचा तपास केला असता माहिती मिळाली की हे सांगाडे नॉन युरोपियन आणि कुठल्यातरी आशियायी देशाच्या लोकांचे आहेत.

याबाबत जेव्हा तपास सुरु केला गेला तेव्हा भारतातील दोन सैनिक बेपत्ता असल्याची माहिती इटलीला मिळाली. त्यांनी 2012 मध्ये जिल्हा सैनिक मंडळामध्ये भरतीवेळी नमूद केलेल्या पत्त्यावर पत्र पाठवून दोन्ही सैनिकांची माहिती मागवली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे छाननी करण्यात आली. पुढे ऑगस्ट 2018 मध्ये जिल्हा सैनिक मंडळ आणि मिलिटरीच्या सैनिकांनी घरी येऊन संपूर्ण कुटुंबाची माहिती घेतली. त्यानंतर दोन्ही सांगाड्यांची ओळख पटल्यावर भारतीय सेना दल इटलीला रवाना झाले, जे 3 जून रोजी भारतात परतले. अखेर 75 वर्षांनतर दोन्ही परिवारांना या अस्थी मिळाल्या. गुरुवारी या अस्थींचे ब्रजघाटावर  अफडी विधिवत विसर्जन करण्यात आले.