पत्नी सतत लाडू खाऊ घालते म्हणून पतीकडून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पती पत्नी यांच्यात वारंवार वाद होऊ लागला की, ते दोघे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. घटस्फोट घेण्यामागचे कारणही गंभीर आणि लोकांना पटण्यासारखे असतात. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. आपली पत्नी सतत लाडूच खाऊ घालत असल्याने एका व्यक्तीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच आपली पत्नी मांत्रिकाच्या प्रभावाखाली असल्याचेही त्याने सांगितले.

हा दांपत्याचे १० वर्षापूर्वी लग्न झाले आहे. या दापत्यांना तीन मुले आहेत. पतीने दिलेल्या माहितीनुसार, आपण गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होतो. दरम्यान, आपली पत्नी एका मांत्रिकाच्या संपर्कात आली. पतीला केवळ लाडूच खायला दे असा सल्ला त्या मांत्रिकाने आपल्या पत्नीला दिला. आपली पत्नीही मांत्रिकाने सांगितल्यानुसार आपल्याला जेवताना लाडूच खायला देते. पत्नीच्या अशा वागणुकीला पती पूर्णपणे वैतागला आहे. त्याला सकाळी चार आणि संध्याकाळी चार लाडू खावा लागत असे. या दरम्यान आपल्याला कोणतेही अन्न खायला दिले जात नाही, असे पतीने सांगितले आहे. यासाठीच पतीने कौटूंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

घटस्फोटाच्या अर्जासाठी दिलेले हे कारण ऐकून कुटूंब सल्ला केंद्रातील अधिकारी गोंधळात पडले आहेत. आम्ही समुपदेशनासाठी दांपत्याला बोलावू शकतो. पण फक्त अंधश्रद्धाळू आहे म्हणून महिलेवर उपचार करु शकत नाही. पतीला लाडू खाण्यास दिल्याने तब्येत सुधारेल असा तिचा विश्वास आहे. इतर कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास ती तयार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.