
Uttarakhand: केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा असल्याचे भासवून हरिद्वारमधील राणीपूर येथील भाजप आमदार आदेश चौहान यांच्याकडे एका तरुणाने फोनवरून पाच लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, चौहान यांना फोन करणाऱ्याने आक्षेपार्ह भाषेत उत्तर दिले आणि पैसे देण्यास नकार दिल्यास सोशल मीडियावर प्रतिष्ठा खराब करण्याची धमकी दिली. रविवारी सायंकाळी उशिरा आमदार आदेश चौहान यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. भाजप आमदार आदेश चौहान यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्याबरोबरच आरोपींनी नैनीतालच्या आमदार सरिता आर्य आणि रुद्रपूरचे आमदार शिव अरोरा यांना मंत्री बनविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
फोन आल्यानंतर लगेचच आमदाराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली, त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. डोबल यांनी सांगितले की, पोलिस पथकांनी मोबाइल फोनचे सीडीआर, आयएमईआय क्रमांक आणि लोकेशन ट्रॅक केले. गाझियाबाद आणि दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकून आरोपी पंतला गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइलसह दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियांशू पंतयाच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून आणखी दोघांची ओळख पटली असून त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे, तर दुसरा सध्या फरार आहे. हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रमोद सिंह डोबल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पंत (१९) याला सोमवारी दिल्लीत अटक करण्यात आली, तर उवेश अहमदला उधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूर येथे पकडण्यात आले. गौरव नाथ यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती डोबल यांनी दिली. या तिघांनी आलिशान जीवन जगण्यासाठी आमदारांकडून पैसे उकळण्याचा कट रचल्याची कबुली पंतने चौकशीदरम्यान दिली.