उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी 'वंदे भारत एक्सप्रेस'मध्ये तांत्रिक बिघाड; उद्या ट्रेन धावणार का नाही याबाबत शंका
वंदे भारत एक्स्प्रेस (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल बहुप्रतीक्षित 'वंदे भारत एक्सप्रेस' (Vande Bharat Express) अर्थात ट्रेन 18 (Train 18)चे उद्घाटन झाले. भारतातील इंजिनविरहीत धावणारी ही सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. मात्र उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी या रेल्वेत तांत्रिक बिघाड झाला होता. एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी अजून रुजू झालेली नसल्याने, गाडीत कोणीच नव्हते. यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाही, मात्र या गाडीने जनावरांना धडक मारल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात गुरे चरत असल्याने टुंडलापासून 18 किलोमीटर अंतरावर ही गाडी थांबवण्यात आली होती.

वंदे भारत एक्सप्रेस ही 17 फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे, यासाठी तिला वाराणसीहून दिल्लीला आणले जात होते. मात्र अचानक ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ट्रेन पूर्णपणे बंद पडण्याआधीच ट्रेनच्या मागील डब्यातून काही आवाज येत होते, मागील चार डब्यांमधून धूर आणि विचित्र वास येत होता. यानंतर चाकांमध्ये अडचण येऊ लागली आणि शेवटच्या डब्याचे ब्रेक जाम झाले. शेवटी गाडीचा वेग कमी करून 40 ते 50 किमी ताशी करण्यात आला. रेल्वे रुळांवरुन जनावरे गेल्यानं एक्स्प्रेसची चाके रुळांवरुन घसरल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान एक्स्प्रेस पुन्हा रुळावर आणण्यात यश आले असून सकाळी एक्स्प्रेस पुन्हा दिल्लीला रवाना झाली आहे. (हेही वाचा : ‘वन्दे भारत’ एक्स्प्रेसची बुकींग सुरु; IRCTC वरुन मिळवा कन्फर्म तिकीट)

पुन्हा एकदा ट्रेन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे उद्या ट्रेन धावणार का नाही याबाबत शंका आहे. इंजिनविरहीत असलेल्या या एक्स्प्रेसचा वेग ताशी 130 किलोमीटर आहे. ही रेल्वे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत चेन्नई इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. जवळजवळ 100 कोट रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या ट्रेनमध्ये 16 कोच आहेत, ज्यामधून 1,100 हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात.