Himachal Pradesh Weather: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) अनेक भागांमध्ये शुक्रवारी जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) झाली, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. काश्मीरच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम हिमवृष्टीची नोंद झाली. सकाळपासून उंच भागात हिमवृष्टीला सुरुवात झाली, तर श्रीनगर (Srinagar) सह मैदानी भागात दुपारनंतर बर्फवृष्टी झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर शहरात तीन इंच बर्फाची नोंद झाली आहे. श्रीनगर व्यतिरिक्त, गांदरबल, अनंतनाग, कुलगाम, शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यांच्या मैदानी भागातही हंगामातील पहिली बर्फवृष्टी नोंदवण्यात आली.
बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम -
गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्ट, सोनमर्ग आणि पहलगामचे पर्यटन रिसॉर्ट, गुरेझ, झोजिला अक्ष, साधना टॉप, मुगल रोड आणि बांदीपोरा, बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यातील अनेक भागात बर्फवृष्टीची नोंद झाली. मुसळधार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह महामार्ग आणि मुघल रोडही बंद झाला. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला असून सुमारे 2,000 वाहने अडकून पडली आहेत. (हेही वाचा -Snowfall in Himachal Pradesh: हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; तीन राष्ट्रीय महामार्गांसह 226 रस्ते बंद)
2000 वाहने अडकली -
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'बर्फ हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी आज जम्मू ते श्रीनगरला गाडी चालवली. बनिहाल ते श्रीनगरपर्यंत सतत बर्फवृष्टी होत होती. परिस्थिती खूपच धोक्याची होती. मला समजले की बोगदा आणि काझीगुंड दरम्यान सुमारे 2000 वाहने अडकली आहेत. माझे कार्यालय दक्षिण काश्मीरमधील प्रशासनाच्या संपर्कात आहे. बर्फ हटवण्याचे काम पूर्ण झाले असताना, जड वाहनांना जाण्याची परवानगी दिली जात आहे. तसेच अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.' (हेही वाचा - Snowfall in Himachal: हिमाचलमध्ये बर्फवृष्टी! 174 रस्ते बंद; 1 हजारहून अधिक वाहने अडकली, 700 पर्यटकांची सुटका)
I drove from Jammu to Srinagar today. It snowed continuously from Banihal to Srinagar. The conditions were quite treacherous. I understand there are around 2000 vehicles stuck between the tunnel & Qazigund. My office has been in touch with the administration in South Kashmir.… pic.twitter.com/i8JOUDt4Fr
— Omar Abdullah (@OmarAbdullah) December 27, 2024
कुल्लू येथून 5 हजार पर्यटकांची सुटका -
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी दुपारनंतर हवामानात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील सोलांग नाला या स्की रिसॉर्टमध्ये अडकलेल्या सुमारे 5,000 पर्यटकांची शुक्रवारी हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्यात जोरदार बर्फवृष्टी दरम्यान सुटका केली. कुलू पोलिसांनी सांगितले की, सोलंग नाल्यात सुमारे 1,000 वाहने अडकल्यानंतर 27 डिसेंबर रोजी बचाव कार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान, ताज्या हिमवृष्टीमुळे सोलंग नाल्यात सुमारे 1000 पर्यटक आणि इतर वाहने अडकली होती. या वाहनांमध्ये सुमारे 5000 पर्यटक होते. कुल्लू पोलिसांनी वाहने आणि पर्यटकांची सुटका करून सुरक्षित स्थळी नेले आहे. बचावकार्य ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं कुल्लू पोलिसांनी X वरील एका पोस्टमध्ये सांगितलं आहे.