Snowfall in Himachal (फोटो सौजन्य - ANI)

Snowfall In Himachal: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मनाली (Manali) येथे झालेल्या जोरदार हिमवृष्टी (Snowfall) नंतर सोलंग आणि अटल बोगदा, रोहतांग दरम्यान अनेक वाहने तासन्तास अडकल्याने सुमारे 700 पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बर्फवृष्टी सुरू असल्याने प्रवासी आणि चालकांना त्यांच्या वाहनांमध्ये नेव्हिगेट करण्यात पोलिस कर्मचाऱ्यांनी मदत केली. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनीही बचाव कार्यात समन्वय साधला. शिमला, मसुरी, धनौल्टी, चक्रता, कुफरी, किन्नौर, कुल्लू, चंबा, लाहौल-स्पीती आणि डलहौसी पर्वतांमध्ये सर्वत्र बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात हवामान बदलले आहे.

काश्मीरचे दल सरोवर गोठले -

दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या मैदानी भागात पाऊस आणि पर्वतांनी बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. सोमवारी हलक्या पावसानंतर पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक भागात दिवसाचे तापमान झपाट्याने घसरले, तर काश्मीरमध्ये थंडीची तीव्र लाट कायम राहिली. तसेच पारा शून्याच्या खाली अनेक अंशांनी घसरला. बर्फवृष्टीमुळे काश्मीरचे दल सरोवर गोठले आहे.

बर्फवृष्टीमुळे वाहने अडकली -

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील शिमला आणि आसपासच्या भागातही हलकी बर्फवृष्टी झाली. ज्यामुळे राज्यातील अनेक रस्ते बंद झाले आणि 1000 हून अधिक वाहने अटल बोगद्याजवळ अडकली. वर्षाच्या शेवटच्या दिवसांतही पाऊस आणि बर्फवृष्टीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

उत्तराखंडच्या डोंगरावर बर्फवृष्टी -

तथापी, चमोलीच्या निती खोऱ्यातील खडकांवरून कोसळणारे पाणी गोठले आहे. तसेच वाहणारी नदीही बर्फाच्या चादरीत हळूहळू गोठत आहे. 2024 च्या शेवटच्या आठवड्यात उत्तराखंडच्या डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीने पर्यटक, शेतकरी आणि व्यापारी यांना नयनरम्य दृष्याचा आनंद घेता येत आहे. डोंगरावरील बर्फवृष्टीमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.