Jammu & Kashmir: श्रीनगरमध्ये चकमक, सीआरपीएफच्या हल्ल्यात एक दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरू
Photo Credit - ANI

श्रीनगरमध्ये (Srinagar) सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई अजूनही सुरू आहे. ते म्हणाले की, यापूर्वी सीआरपीएफ (CRPF) जवानांवर हल्ला करणारा एक दहशतवादी मारला गेला आहे. तर दुसऱ्याला सुरक्षा दलांनी घेरले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बिशंबर नगरमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झाली आणि एक दहशतवादी ठार झाला.

4 एप्रिल रोजी सीआरपीएफ जवान झाला होता शहीद 

IGP विजय कुमार यांनी सांगितले की, मारला गेलेला दहशतवादी 4 एप्रिलला श्रीनगरच्या मैसुमा भागात झालेल्या हल्ल्यात सामील होता, ज्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आणि दुसरा जखमी झाला. आयजीपी यांनी ट्विटरवर सांगितले की, "सीआरपीएफ जवानांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक श्रीनगरमध्ये चकमकीत मारला गेला, तर दुसऱ्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत." (हे देखील वाचा: Schools Receive Bomb Threats: बेंगळुरूमधील 6 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू)

अनंतनागमध्येही चकमक

यापूर्वी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील शिरहामा परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आणि ऑपरेशनचे चकमकीत रूपांतर झाले. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.