आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांकडून अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

दिल्ली पोलिसांनी  गुन्हे शाखेच्या मदतीने 20 वर्षीय तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर  ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी तरुण 'डार्क वेब' (Dark web)च्या माध्यमातून ही तस्करी करत असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी आणखी काही सदस्य तस्करी करत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तसेच डार्क वेबचा आधार घेत हे सर्वजण आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्रेत्यांकडून कुरिअरच्या माध्यमातून चरस आणि अन्य मादक पदार्थांची तस्करी करत होते.

शहरात शिकणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांना अटक केल्यानंतर आणखीन सदस्यांचा पोलिस शोध घेत आहे. पोलिसांच्या मते जे कुरिअर आरोपी तरुणांकडून जप्त करण्यात आले आहे ते नवीन वर्षाच्या पार्टीसाठी वापरण्यात येणार होते. गुप्तहेरांकडून पोलिसांना कॉलेजमध्ये शिकणारे रिदम आणि साहिल हे दोघे ड्रग्जची आयात आणि निर्यात करत असल्याचे समजले होते. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून तस्करीचे काम पूर्ण करत होते.

या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून आरोपी तरुणांना अटक केली आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.