
गेल्या काही महिन्यांत अॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) 15 हजार कर्मचार्यांनी आपली बँकेतील नोकरी सोडल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार बँकांचे व्यवस्थापन बदलल्यामुळे (Axis Bank Management Changes) कर्मचार्यांना काम करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मध्यम-स्तरीय कार्यकारिणीने बँकेची नोकरी सोडली आहे. नवीन व्यवस्थापन बँकेच्या प्रगतीसाठी शाखेचे कामकाज बदलत आहे. शिखा शर्मा यांनी एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सोडल्यानंतर, अॅक्सिस बँकेने 1 जानेवारी 2019 पासून अमिताभ चौधरी यांना नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी म्हणून नियुक्त केली आहे.
अमिताभ चौधरी यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. 2010 पासून अमिताभ चौधरी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्सचे सीईओ आणि एमडी देखील आहेत. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, गेल्या काही महिन्यांत अनेक वरिष्ठ लोकांनी बँक सोडली आहे. त्यामागे बॅंकमध्ये झालेले नवीन काळातील बदल हे कारण सांगितले जात आहेत. त्यामुळे आता बँक वेगाने नवीन लोक भरती करीत आहेत, तसेच बँकेच्या कामकाजात मोठा बदल करण्यात आला आहे. मात्र नवीन बदल झाल्यानंतर अनेकांना त्याच्या भूमिकेबद्दल चिंता वाटू लागली त्यामुळे असुरक्षित वाटून लोकांनी ही नोकरी सोडली आहे. (हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला ठाणे महानगरपालिकेचा दणका; Axis Bank मधील खाती सरकारी बँकेमध्ये वळवण्याचा निर्णय)
अॅक्सिस बँकेने चालू आर्थिक वर्षात एकूण 28 हजार लोकांना नोकरी दिली आहे. तसेच जानेवारी ते मार्च या तिमाहीत बँकेने 4 हजार कर्मचार्यांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे. बँकेचे एमडी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे म्हणणे आहे की, नियामक मान्यता मिळाल्यानंतर बँक विमा क्षेत्रात प्रवेश करेल. अॅक्सिस बँक हे विम्याचे एक प्रमुख वितरक आहे. बँकांना विम्यात जास्त हिस्सेदारीची परवानगी नाही. यासाठी, नवीन विमा कंपनी तयार केली जाणार नाही, त्यामुळे चांगली विमा कंपनी खरेदी करण्याकडे बँकेचे लक्ष आहे.