Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Cases in India: देशात कोरोनाच्या नव्या लाटेची भीती असताना, कोविड-19 च्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron New Variant) 11 उप-प्रकार परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये आढळून आले आहेत. 24 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान 19,227 आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 124 कोविड पॉझिटिव्ह आढळले.

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे नमुने आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरांवर घेण्यात आले. तपासणीत कोरोना बाधित आढळलेल्या 124 प्रवाशांना आयसोलेशन करण्यात आले आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की 124 पॉझिटिव्ह बाधितांपैकी 40 च्या जीनोम सिक्वेन्सिंगचे निकाल आले आहेत. यापैकी, ओमिक्रॉनच्या XBB.1 सबस्ट्रेनचे जास्तीत जास्त 14 नमुने आढळले. त्याच वेळी, एकामध्ये BF.7.4.1 व्हेरिएंट आढळला. (हेही वाचा - COVID-19 Second Booster Dose Not Required: मागील 24 तासांत 134 नवे कोरोना रूग्ण समोर; अद्याप दुसर्‍या बुस्टर डोसची गरज नाही - सूत्रांची माहिती)

गुरुवारी देशात कोविड संसर्गामध्ये किंचित वाढ झाली. गेल्या 24 तासांत 188 नवीन रुग्ण आढळले, तर बुधवारी 174 नवीन रुग्ण आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणांसह, देशात आतापर्यंत एकूण 4,46,79,319 बाधित झाले आहेत. त्याच वेळी, सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या 2554 वर आली आहे. तर आतापर्यंत 5,30,710 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, Omicron च्या BF.7 च्या सब-व्हेरियंटने चीन, अमेरिका आणि जपानमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. याबाबत भारत सरकार आधीच अलर्ट मोडमध्ये आले आहे. या धोकादायक प्रकाराची प्रकरणे भारतातही समोर आली आहेत. मात्र, सध्या या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूच्या बाबतीत इतकी भयंकर परिस्थिती नाही.