Ye re ye pawasa

पाऊस... कधी धुक्यांच्या कुशीत कुंद होऊन बरसणारा तर कधी धो-धो कोसळणारा...कधी हवाहवासा वाटणारा तर कधी जीव नकोसा करणारा ... त्याची प्रतिक्षा मात्र सगळ्यांना असते. एका छोटयाशा खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपट. ‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ या आणि अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा हा चित्रपट १७ जूनला तुमच्या भेटीला येतोय. १४ देशातल्या ३१ चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या चित्रपटाने २२ नामांकन आणि १६ पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे.

ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. (हे देखील वाचा: राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री)

छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, चिन्मयी साळवी, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.