भारतरत्न लता मंगेशकर यांना आज आपण गाणकोकिळा म्हणून ओळखतो. जगभरातील असंख्य संगित प्रेमींच्या हृदयावर त्या राज करतात. आजही त्यांची गाणी ऐकताना लोक हरवून जातात. लोक त्यांना प्रेमाणे दीदी म्हणतात. लातादीदींनी गायन आणि संगित क्षेत्रात अत्युच्च स्थान मिळवले आहे. पण, त्यासाठी त्यांचा संघर्षही तितकाच कठोर आहे. सांगितले जाते की, स्टेजवरुन पहिले गाणे गायले तेव्हा, त्यांना २५ रुपये इतके मानधन मिळाले. ही त्यांची पहिली कमाई होती. मात्र, याच लतादीदींच्या जीवनात एक क्षण असा आला की, त्यांनी मृत्यू काय असतो हे जवळून अनुभवले. आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल की, त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. लतादीदींना विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. अनेकांना हे वाचून धक्का बसला असेल. म्हणूनच वाचा पुढील माहिती....
लतादीदींच्या जवळच्या वर्तुळातील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेखिका पद्मा सचदेव यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. ही घटना आहे साधारण १९६२मधली. या घटनेमुळे लतादीदी सुमारे ३ महिने गाऊ शकल्या नाहीत. त्या वेळी त्यांच्यावर योग्य उपचार झाला नसता तर, कदाचित काही भलतेसलते घडले असते. पद्मा सचदेव आपल्या पुस्तकात लिहितात, 'एका सकाळी लतादीदी नेहमीप्रमाणे उठल्या. मात्र, त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. काही वेळाने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. इतकी की त्यांना उलट्या होऊ लागल्या. पोट दुखत असल्याने त्या निटपणे बसूही शकत नव्हत्या. त्यांची अवस्था पाहून डॉक्टरांना तात्काळ बोलावण्यात आले. लतादीदींवर उपचार सुरु झाले.'
लतादीदींची प्रकृती सुधारण्यास सुमारे तीन महिने लागले. या प्रसंगातून बाहेर पडलेल्या लतादीदी बऱ्याच थकल्या होत्या. ज्यामुळे त्या तीन महिने गाऊ शकल्या नाहीत. त्याची प्रकृती ठिक झाल्यावर डॉक्टांनी त्यांना सांगितले की, त्यांच्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. त्यांना हलक्या मात्रेत विष देण्यात आले होते. असेही बोलले जाते की, लतादीदींना ज्या दिवशी उलट्यांचा आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्याच रात्री त्यांचा स्वयंपाखी नोकरी सोडून पळाला होता. कालांतराने समजले की, त्याने अनेक कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर बराच काळ लतादीदींच्या भगिणी उषा मंगेशकर यांनी घरातील स्वयंपाकघराचा ताबा घेतला. त्या लतादीदींच्या खाण्यापीण्याच्या प्रत्येक गोष्टींवर बारीक नजर ठेऊन असत. पद्मा सचदेव यांच्या हवाल्याने अनेक प्रसारमाध्यमांनी लतादीदींबाबत हे वृत्त दिले आहे.