स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेच्या नंतर आता झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर ‘तुला पाहते रे’ व ‘जय मल्हार’ या दोन जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या 6 एप्रिलपासून या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणार आहेत. दुपारी 12 वाजता तुला पाहते रे तर संध्याकाळी 6 वाजता जय मल्हार अशा या मालिकेच्या प्रक्षेपणाच्या वेळा आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्व मालिकांचे शूटिंग सुद्धा बंद आहे, त्यामुळे कोणत्याही मालिकेचे नवे भाग आता दाखवता येणार नाहीत. यावेळी जुन्या मालिकांचे भाग पुन्हा प्रसारित केले जात आहेत. यामध्ये अलीकडेच संपलेली स्वराज्यरक्षक संभाजी मालिका काही दिवसांपासून पुनःप्रसारित केली जात आहे. आता त्यात या दोन गाजलेल्या मालिका सुद्धा दाखवल्या जाणार आहेत. Shaktimaan New Timing: दूरदर्शन वर आजपासून शक्तिमान येणार भेटीला; पहा प्रक्षेपणाची नवीन वेळ
'तुला पाहते रे’ या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची म्हणजेच विक्रांत सरंजामे आणि ईशा या दोघांची केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. नेहमीपेक्षा बऱ्याच वेगळा विषय असल्याने या मालिकेला अफलातून टीआरपी मिळाला होता. त्यावेळी ही मालीका टीआरपी रेटिंग मध्ये टॉपला होती. गेल्या वर्षी जून महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.
तर दुसरीकडे महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडेरायांची जीवनकथा सांगणारी ‘जय मल्हार’ ही मालिकासुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली होती. खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसा देवीच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूचे पात्र साकारलेली ईशा केसकर यांना या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली होती. या तिघांनी सुद्धा पहिल्यांदाचा छोट्या पडद्यावर काम केले होते.यात खंडोबांचा लग्नसोहळा हा विशेष गाजलेला भाग ठरला होता.
दरम्यान 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असल्याने तोवर तरी शूटिंग होणे शक्य नाही त्यामुळे नवे भाग सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत, पण त्याऐवजी या जुन्या गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण करून प्रेक्षकांना चांगला पर्याय दिला जात आहे. या निर्णयावर अनेकांनी आनंद व्यक्त करत यासोबतच आभाळमाया, वादळवाट या सीरियल सुद्धा पुन्हा दाखवा अशी मागणी केली आहे.