Veteran Actress Rekha (Photo Credits: Instagram)

'इन आंखों की मस्ती में' या गाण्यामधून आपल्या दिलखेचक अदांनी अवघ्या सिनेसृष्टीला वेडं लावणारी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Veteran Actress Rekha) आता छोट्या पडद्यावरही आपली जादु पसरवण्यास सज्ज झाली आहे. अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या अभिनेत्री रेखा आता स्टार प्लसवरील (Star Plus) 'गुम है किसी के प्यार में' (Gum Hai Kisi Ke Pyar Me) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेखा यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागणार आहे. त्यांच्या एक झलक पाहण्यासाठी आसुसलेल्या त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे.

या प्रोमो मध्ये रेखा स्वत: 'गुम है किसी के प्यार' हे गाणे गाताना दिसत आहे. यात त्यांनी 'हे गाणे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असून यात काही तरी एक गोष्ट दडलेली आहे. ज्यात प्रेमाची वाट पाहू शकतो मात्र त्याचे नाव घेण्याचा परवानगी नाही' असे रेखा सांगत आहे. अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून पळून गेली होती रेखा; बिग बी यांच्या वाढदिवशी पुन्हा झाला व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

या प्रोमोमधील रेखा यांच्या मादक नजरा, दिलखेचक अदा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणा-या आहेत. वयाची 65 वर्ष पूर्ण करुनही त्यांच्या सौंदर्यात तसूभरही कमी झाली नाही उलट ते आणखीनच खुलून आलेले या प्रोमो मध्ये दिसत आहे. मात्र या मालिकेत रेखा स्वत: काही भूमिका करणार की काही दिवस पाहुणा कलाकार म्हणून काम करणार हे येणा-या काही दिवसात कळेल. 'गुम है किसी के प्यार में' ही मालिका 5 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह रोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या प्रोमोमागचे रहस्य हे त्याच दिवशी सर्वांना कळेल.