Karanvir Bohra (संग्रहित संपादित प्रतिमा)

लोकप्रिय टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा (Karanvir Bohra) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका 40 वर्षीय महिलेने करण आणि इतर 5 जणांविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. 2.5% व्याज रिटर्न देण्याचे आश्वासन देऊन अभिनेत्याने 1.99 कोटी रुपये घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. यातील केवळ 1 कोटीच रुपये परत करण्यात आल्याचे महिलेने सांगितले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, मनोज बोहरा उर्फ ​​करणवीर बोहरा याने तिच्याकडून 1.99 कोटी रुपये उसने घेतले होते.

हे पैसे 2.5 टक्के व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन अभिनेत्याने दिले होते. परंतु त्यातील केवळ 1 कोटी रुपयेच परत करण्यात आले. महिलेचा आरोप आहे की जेव्हा तिने तिचे पैसे परत मागितले तेव्हा बोहरा आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही, यासह तिला गोळ्या घालण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांचे म्हणणे आहे की, करणवीर बोहरा आणि इतरांविरुद्ध तपास सुरू करण्यात आला असून, लवकरच त्यांचे जबाब नोंदवले जातील.

दरम्यान, करणवीर बोहरा नुकताच कंगना राणौतचा रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये दिसला होता. त्यात त्याने आपण डोक्यापासून पायापर्यंत कर्जात बुडालेलो असल्याचे उघड केले होते. याबाबत आपल्यावर अनेक खटले सुरू असल्याचेही त्याने सांगितले होते. करणवीर बोहराने रडत रडत सांगितले होते की, त्याच्या जागी दुसरे कोणी असते तर त्याने आत्महत्या केली असती. (हेही वाचा: कार अपघातानंतर माही विजला बलात्काराची धमकी; अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांना मागितली मदत)

करणवीर बोहराचे खरे नाव मनोज बोहरा आहे. त्याने 'नच बलिए 4', 'झलक दिखला जा 6', 'खतरों के खिलाडी 5', 'बिग बॉस 12' सारख्या सुमारे दहा रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. मात्र तो एकही शो जिंकू शकला नाही. यावरून 'लॉक अप'च्या लॉन्चिंगवेळी त्याला मीडिया आणि कंगना रणौतने 'लूझर' म्हटले होते.