बिग बॉसच्या 12 व्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. 11 वे पर्व गाजले ते मराठमोळ्या शिल्पा शिंदेमुळे. तर 12 व्या पर्वात नेहा पेंडसे हा बोल्ड मराठी चेहरा स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वातील वाद हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत, आणि पहिल्याच दिवशी याचा प्रत्यय आला. स्पर्धकांची अरेरावी, एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी, वादग्रस्त विधाने यांमुळे बिग बॉस नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. शिवीगाळ आणि मारहाण हे तर बिग बॉसचे युएसपी म्हणावे लागतील. मागील काही पर्वावांवर नजर टाकली तर असे अनेक कलाकार दिसतील ज्यांच्यामुळे बिग बॉसचा टीआरपी नेहमीच उंचावला. प्रिन्स नरुला, अली कुली मिर्जा, कुशल टंडन, आकाशदीप सहगल, राखी सावंत, इमाम सिद्दीकी, डॉली बिंद्रा, स्वामी ओम, अर्शी खान हे बिग बॉस पर्वातील काही वादग्रस्त नावे होय. बिग बॉसमध्ये मराठी लोकांचे वर्चस्व फारच कमी राहिलेले आहे, मात्र मराठीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे बिग बॉसमध्ये आले तर यांच्याशी पंगा घेणे हे इतर स्पर्धकांना महागात पडू शकते. चला पाहूया असे कोणते मराठी कलाकार आहेत जे गाजवू शकतील बिग बॉसचा रंगमंच
मेघा धाडे – 50 टक्के पेक्षा जास्त वोट्स मिळवून बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील विजेती मेघा घाडे, चर्चेत राहिली ते तिच्या रोखटोक आणि फटकळ बोलण्याने. बिग बॉसमधील सर्वात कणखर स्पर्धक म्हणून तिच्याकडे पहिले गेले. पुष्कर आणि सईशी फारकत घेतल्यानंतरही तिने एकटीने सर्वांना तोंड दिले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मेघाने हिंदी बिग बॉसची स्पर्धक व्हायला आवडेल असे सांगितले. ‘मेघा खोटं वागते’, ‘मेघाला गेमपुढे काही दिसत नाही’, ‘मेघा शब्द फिरवते’, ‘ती प्रचंड अभ्यास करुन आली आहे’ असे अनेक आरोप तिच्यावर केले गेले. मात्र मेघाने नेहमीच मैत्रीपेक्षा जिंकण्याला जास्त महत्व दिले. मेघा ज्या जिद्दीने मराठी बिग बॉस खेळली आणि जिंकली ज्याच जिद्दीने ती हिंदी बिग बॉसही खेळेल यात शंका नाही.
सई ताम्हणकर - मराठी सिनेसृष्टीत बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठी चित्रपटसृष्टीला नवे ग्लॅमर मिळवून दिले. मुळच्या सांगलीच्या असलेल्या सईसाठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणे सोपी गोष्ट नव्हती. मात्र स्वतःच्या मतांवर आणि विचारांवर ठाम असलेल्या सईने स्वतःला जे योग्य वाटेल तेच केले. मराठी मधील पहिली बिकिनी गर्ल सई जर का बिग बॉसच्या घरात आली तरी तिथेही तिच्या ठाम मतांमुळे ती इतरांवर भारी पडेल यात काहीच शंका नाही.
वंदना गुप्ते - आपल्या अनोख्या अभिनयाने एक वेगळाच ठसा उमटवणाऱ्या वंदना गुप्तेंकडे एक स्वतंत्र, ओपन माईंडेड व्यक्तिमत्व म्हणून पहिले जाते. अन्यायाची चीड असणाऱ्या वंदना गुप्ते कोणत्याही बाबतीत पुरुषांची मक्तेदारी खपवून घेत नाहीत, म्हणूनच इतकी वर्षे त्या आणि त्यांचा दरारा इंडस्ट्रीमध्ये टिकून आहे. आजही त्यांच्या नुसत्या नावानेच चित्रपटसृष्टीमधील अनेकांना धडकी भरते. तर अशा इतक्या कडक व्यक्तिमत्वाचा स्पर्धक समोर असल्यावर बिग बॉसमधील इतर स्पर्धकांची काय परिस्थिती होईल याचा आपण अंदाज लावू शकतो.
अश्विनी काळसेकर – हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायीकांपैकी एक असलेली अश्विनी मराठी मध्ये ‘फु बाई फु’ची जज म्हणून दिसली होती. कसम से आणि जोधा अकबर या मालिकेमधील तिच्या भूमिकेसाठी अश्विनीला ‘बेस्ट व्हिलन’चे पुरस्कार मिळाले आहेत. यावरून तुम्हाला अश्विनीच्या व्यक्तीमत्वाची कल्पना येऊ शकते. अश्विनीचा आवाजच समोरच्याला पूर्णपणे शांत करण्यास पुरेसा आहे, त्यामुळे अश्विनी जर का बिग बॉस मध्ये आली तर इतर स्पर्धक तिच्या समोर टिकतील का नाही हो मोठा प्रश्नच आहे.
सोनाली कुलकर्णी – मराठीसोबत हिंदी आणि इतर अनेक भाषांमधून सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सोनालीने जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत तितक्या क्वचितच दुसऱ्या कुठल्या मराठी अभिनेत्रीने केल्या असतील. प्रत्येक भूमिकेमधून नवे काही शिकून ती गोष्ट सोनालीने आपल्या व्याक्तीमत्वामध्ये अंगिकारली आहे. म्हणूनच सोनालीला टक्कर देणे हे तितके सोपे नाही. चांगल्याशी चांगले आणि वाईंटाशी वाईट अशी राहणारी सोनाली बिग बॉसच्या घरातीत लोकांचे नखरे अजिबात सहन करणार नाही, म्हणून ती जर का बिग बॉसमध्ये आली तर इतर लोकांसोबत ती कसे नाते प्रस्थापित करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.