Swarajya Janani Jijamata: सिद्धी जोहर (Siddhi Johar) च्या वेढ्यातून शिवरायांच्या सुटकेचा रोमांचक प्रसंग प्रेक्षकांना आज ‘स्वराज्य जननी जिजामाता’ मालिकेत पाहता येणार आहे. या पर्वाचा विशेष भाग सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका आज 12 ते 14 मे दरम्यान रात्री 8.30 वाजता पाहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील हा रोमांचकारी प्रसंग प्रेक्षकांना पाहता यावा, यासाठी मालिकेच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. मालिकेच्या दिग्दर्शकांने हा अध्याय दाखवण्यासाठी कृत्रिम पावसाच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी शुटिंग केलं.
शिवरायांनी पन्हाळा ते विशाळगड असा खडतर डोंगररांगातील प्रवास आपल्या मावळ्यांसोबत पूर्ण केला होता. पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा शिवरायांचा थरार अंगावर काटा आणणारा आहे. आदिलशहाला प्रतापगडाचा पराभव चांगलाचं जिव्हारी लागला होता. या पराभवानंतर आदिलशहाने सिद्धी जौहरला महाराजांच्या बंदोबस्तासाठी पन्हाळ्यास पाठवले. पावसात वेढा चालवणं विजापूरी सैन्यास अशक्य होईल, हा शिवरायांचा अंदाज सिद्धीने खोटा ठरवला. (वाचा - अभिनेता अंकुश चौधरी याने 'दुनियादारी' चित्रपटातील लोकप्रिय डायलॉगद्वारे लोकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून दिला महत्त्वाचा संदेश)
शिवाजी महाराजांनी या कडेकोट वेढ्यातून निसटून जाण्यासाठी निवडक मावळे घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या वेळी निसटण्याची मोहीम आखली होती. या मोहिमेतील शिवा काशिदांचे हौतात्म्य, बाजी-फुलाजी बंधूंचा पराक्रम, बांदलांच्या अज्ञात मावळ्यांचे शौर्य आणि बलिदान, विशाळगडाच्या पायथ्याशी महाराजांचा घनघोर संग्राम या सर्व रोमांचकारी आणि पराक्रमी प्रसंगांची कथा आज प्रेक्षकांना सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या विशेष भागात पाहता येणार आहे.
दरम्यान, स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सोनी मराठी या वाहिनीवर सुरू झाली होती. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून या मालिकेची निर्मिती करण्यात आली. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.