सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन त्यांच्या दर्शकांना भव्य शो आणि कौटुंबिक करमणुक देण्यासाठी ओळखले जाते. आता पुन्हा एकदा सोनी टीव्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई (Punyashlok Ahilyabai) यांच्या जीवनाच्या रूपाने एक भव्य मालिका आणत आहे. यात 18 व्या शतकातील महान महिला अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची जीवन कथा उलगडणार आहे. अहिल्याबाई होळकर यांची मुख्य भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय बाल अभिनेत्री अदिती जलतारे (Aditi Jaltare) हिची निवड केली गेली आहे. आता माहिती मिळत आहे की, या भूमिकेसाठी 8 महिन्यांपासून 1000 हून अधिक मुलींची ऑडिशन घेण्यात आली आहे व त्यांनतर अदितीची निवड केली गेली.
अहिल्याबाई होळकर यांनी समाजातील रूढीवादी नियमांविरुद्ध लढा दिला आणि एक कणखर व स्वावलंबी महिला शासक म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना केला. भारतीय इतिहासात एक उत्तम महिला शासक म्हणून अहिल्याबाई यांना गौरविण्यात आले आहे. आता यांच्या जीवनावर भाष्य करणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यासाठीच्या ऑडिशनची प्रक्रिया फार कठीण होती. सुरुवातीला पाच किंवा सहा वेळा शॉर्टलिस्टिंग केले गेले व त्यानंतर प्रोडक्शन टीमने मॉक फोटोशूट देखील घेतले. पडद्यावर अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्त्व कसे चित्रित करायचे आहे याची निर्मात्यांची एक अनोखी दृष्टी होती. त्यांची इच्छा होती की जी कोणी मुलगी ही बाल कलाकाराची भूमिका साकारेल, ती लहान मुलाप्रमाणे निरागस असावी तसेच गंभीर संवाद बोलताना तिचे व्यक्तिमत्व उठून दिसावे. (हेही वाचा: पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित, 'हे' मराठी कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत)
याबद्दल बोलताना शोचे दिग्दर्शक जॅक्सन सेठी म्हणाले, ‘एखाद्या लहान मुलीसाठी अहिल्याबाई यांची भूमिका साकारणे खूप आव्हानात्मक आहे. मला वाटते की आम्हाला अदिती जलतारेच्या रूपाने लहान अहिल्याबाई मिळाल्या आहेत. या भूमिकेसाठी अदिती उत्तम पर्याय आहे. तिने यापूर्वी इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे, पण अनुभवाचे ओझे ती आपल्यासोबत बाळगत नाही. ती एक अतिशय नैसर्गिक अभिनेत्री आहे आणि काही नवे शिकायला ती तत्पर आहे.’