Aai Majhi Kalubai मालिकेतून प्राजक्ता गायकवाड ची एक्झिट; वीणा जगताप दिसणार मुख्य भूमिकेत
प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल (PC - Facebook)

Aai Majhi Kalubai: 'आई माझी काळूबाई' (Aai Majhi Kalubai) या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मालिकेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता वीणा जगताप (Prajakta Gaikwad) च्या जागी वीणा जगताप (Veena Jagtap) मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत प्राजक्ता गायकवाडचा वाद झाल्याने तिने मालिकेमधून एक्झिट केली, असं म्हटलं जात आहे. सेटवर उशीरा येणं, चित्रीकरणासाठी अचानक नकार देणं, सुट्टीसाठी परीक्षा किंवा अन्य काही कारणांमुळे अलका कुबल यांनी प्राजक्ताला बाहेरचा रस्त्या दाखवल्याच्याही चर्चा सुरू आहेत. दरम्यान, यासंदर्भात 'आई माझी काळूबाई' मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी सांगितलं की, 'प्राजक्ता सेटवर उशीरा येत असे, तसेच तिला 15 दिवस आधी स्क्रिप्ट हवी असे, चित्रीकरणादरम्यान विविध कारण सांगत अचानक सुट्टी घेणं इत्यादी कारणांमुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे यापुढे आता प्राजक्ताच्या जागी मालिकेत आर्याची भूमिका वीणा जगताप साकारणार आहे,' असंही अलका कुबल यांनी स्पष्ट केलं. (हेही वाचा - Karbhari Lay Bhari Serial: 'कारभारी लय भारी' मालिकेत कारभारीण बनलेली अनुष्का सरकटे याआधी दिसली होती देवी लक्ष्मीच्या भूमिकेत, वाचा सविस्तर)

मात्र, मालिकेतील एक्झिटसंदर्भात प्राजक्ता गायकवाडने वेगळे कारण सांगितलं आहे. मला मालिकेतून काढून टाकलं नाही, तर मी स्वत: मालिका सोडली असल्याचंही प्राजक्ताने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी बोलताना प्राजक्ता म्हणाली की, 'मी सेटवर उशिरा येण्याचा प्रश्नचं नाही. कारण, आम्ही जिथे राहत होतो, तिथेचं शूटिंग सुरू होती. या रुममध्येचं माझा मेकअप व्हायचा. मी मालिकेत काम करण्याअगोदर अलकाताईंना मला इंजिनीअरिंगची परीक्षा द्यायची असल्याचं सांगितलं होतं. मात्र, कोरोनामुळे यावर्षी परीक्षा मे-जूनमध्ये न होता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्यात आल्या. जेव्हा मालिकेच्या शुटिंगला सुरुवात झाली, तेव्हाचं नेमक्या माझ्या परीक्षा सुरू झाल्या. परंतु, मी परीक्षा दिल्या असत्या तर शूटिंग मागे पडलं असतं. त्यामुळे मी परीक्षादेखील दिल्या नाहीत,' असंही प्राजक्ताने सांगितलं.

मालिका सोडण्यामागचं खर कारण स्पष्ट करताना प्राजक्ताने सांगितलं की, 'गेल्या काही दिवसांपूर्वी सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मी पुण्यातून साताऱ्याला गेले, तेव्हा माझ्यासोबत विवेक सांगळेसुद्धा येणार आहे, असं मला सांगण्यात आलं. आम्ही एकाचं गाडीने साताऱ्याला जाणार होतो. यावेळी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांना रुग्णालयात भरती करून आला होता. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसोबत मी सातारा ते मुंबई इतका प्रवास कसा करणार? या एकाच मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर विवेकने मला शिवीगाळ केला. यासंदर्भात मी अलकाताईंना तक्रार केली. मात्र, त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यानंतर जेव्हा विवेक मला सेटवर समोर दिसायचा तेव्हा मला त्याने मला केलेली शिवीगाळ आठवायची. या एकमेव कारणामुळे मी मालिका सोडली,' असं प्राजक्ताने स्पष्ट केलं आहे.