
कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) दरम्यान, सर्वसामान्य जनतेपासून टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत बऱ्याच कलाकारांच्या याबाबतच्या कथा समोर आल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की ते सध्या कोणत्या परिस्थितीमधून जात आहेत. आर्थिक संकटामुळे काही कलाकारांनी आत्महत्या केल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आणखी एक बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये टीव्ही मालिका 'हमारी बहु सिल्क' (Hamari Bahu Silk) ची अभिनेत्री वंदना विठलानी (Vandana Vithlani) देखील आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. वंदना यांची आर्थिक परिस्थिती इतकी हलाकीची झाली आहे की, त्या आता राखी बनवून स्वतःची गुजराण करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सीरियलमध्ये जानकी जोशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या राखी बनवून विकत आहे. अहवालानुसार वंदना यांचे म्हणणे आहे की, केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने व सध्या काम नसल्याने त्यांना राखी बनवून विकण्यास भाग पाडले आहे. काहीच नसण्यापेक्षा हे थोडे तरी बरे, असे वंदना यांचे म्हणणे आहे.
वंदना यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'मी मे ते ऑक्टोबर 2019 पर्यंत शूट केले, परंतु मला केवळ मे महिन्याचेच पैसे देण्यात आले. माझे लाखो रुपये अडकले आहेत. बरेच महिने झाले परंतु मला एक पैसाही मिळाला नाही. माझी सर्व बचतही संपली आहे. मला नोव्हेंबर 2019 मध्ये ‘मुस्कान’मध्ये रोल मिळाला होता, पण दोन महिन्यांनंतर ते देखील बंद झाले. मला या कामाचे पैसे मिळाले होते, परंतु ते किती काळ पुरतील? आता मी राख्या बनवून त्या ऑनलाईन विकत आहे. यामुळे मी स्वत: ला व्यस्त ठेवू शकते आणि काही पैसे कमवू शकते. अर्थात यामधून जास्त कमाई होत नाही पण काहीतरी मिळतंय हेच नशीब.’ (हेही वाचा: 65 वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांसाठी चित्रपट, मालिका निर्मात्यांची कोर्टात धाव)
वंदना अंक ज्योतिषवर आधारीत राख्या बनवत आहेत. ज्याला राखी पाठवायची असेल- भाऊ किंवा वाहिनी, त्यांचे नाव आणि वाढदिवसाची तारीख घेऊन अंकशास्त्रानुसार, ठराविक रंगात ही राखी बनवली जाते. वंदना या राख्या 51 ते 75 रुपयांपर्यंत विकतात. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमधील वंदना यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती.